ग्रामसेवकाकडून ग्रामपंचायत सदस्यपतीस शिवीगाळ

ग्रामसेवकाकडून ग्रामपंचायत सदस्यपतीस शिवीगाळ

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

तालुक्यातील बेलापूर-कोल्हार दरम्यान प्रवरा नदीकाठी असलेल्या एका गावातील ग्रामसेवकाने ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेच्या पतीस शिवीगाळ व दमदाटी केल्याने गावातील वातावरण भलतेच तापले होते. संबंधीत ग्रामसेवकाने माफी मागितल्यानंतर या वादावर पडदा पडला.

या गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महीलेच्या पतीने काल सकाळी फोन करून संबंधीत ग्रामसेवकाकडे माहितीच्या अधिकाराबाबतची कागदपत्रे मागितली. त्याचा राग येवून ग्रामसेवकाने ग्रामपंचायत सदस्य महीलेच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच श्रीरामपूर शहरातील एका राजकीय नेत्याचे नाव घेत दमदाटी केली. यावेळी फोनवर ग्रामपंचायत सदस्य महीलेला देखील त्याने धमकी दिली.

ही घटना समजताच गावातील वातावरण चांगलेच तापले होते. या महिलेच्या पतीने संबंधीत ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली. गावचे उपसरपंच व काही सुजाण ग्रामस्थांच्या मध्यस्थीने तसेच गावाच्या हितासाठी सदरचा वाद गावातच मिटविण्यात आला. तसेच संबंधीत ग्रामसेवकाने माफी मागितल्याने हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला नाही. परंतू या फोनवरील संभाषणाचे रेकॉर्डींग सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने त्याची तालुकाभर चर्चा सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com