ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी

कर्मचारी महासंघाच्यावतीने ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांना निवेदन
ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्य ग्रामपंचायत कर्मचारी

महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली. यावेळी राज्य अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे, उपाध्यक्ष कॉ. सुधीर टोकेकर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष कॉ. सुभाष लांडे, नामदेव चव्हाण, संजय डमाल, मारुती सावंत, सतीश पवार, कॉ. बहिरनाथ वाकळे आदी उपस्थित होते.

राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने वसुली आणि उत्पन्नाची अट घालणार्‍या 28 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयाचा पुनर्विचार करावा किंवा रद्द करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे.

सध्या किमान वेतनाचे दर वाढविण्यात आले असले तरी सदरील शासन निर्णयामुळे वाढीव दराचा कर्मचार्‍यांना लाभ होणार नाही. अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे सध्या चार-पाच महिन्यांपासूनचे वेतन थकीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कर्मचार्‍यांचे जून 2020 पासून थकीत आणि 28 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयामुळे यापूर्वीचे प्रलंबित राहिलेले वेतन त्वरित अदा करावे, 5 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर केलेल्या किमान वेतनाची आर्थिक तरतूद करून वाढीव दराने वेतन अदा करावे, किमान वेतन मिळण्यास अडथळा निर्माण करणारा अर्थात वसुलीचा आणि उत्पन्नाची अट लावणारा शासन निर्णय रद्द करावा, कालबाह्य धरणार्‍या लोकसंख्येच्या आकृतिबंध रद्द करावे,

कपात केलेल्या रक्कमेचा हिशोब द्यावा, ती रक्कम कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा करावी, शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना ग्रॅच्युईटी कायदा लागू करावा, कर्मचार्‍यांची आणि 5 हजार रुपयाची अट रद्द करावी, शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी, अंगणवाडी, आशा कर्मचार्‍यांप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना करोनाच्या संक्रमण काळातील प्रोत्साहन भत्ता द्यावा, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत व्यापक समन्वयक बैठकीचे आयोजन करण्याची मागणी राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com