
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणार्या 195 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले आहे. 14 तालुक्याच्या तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या प्रभाग रचनेचा मसुदा तपासून तो मान्यतेसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवलेला आहे. आता येत्या 17 मार्चला या 195 ग्रामपंचायतींचा प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द होणार आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणार्या जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतीमध्ये 704 प्रभाग असून 1 हजार 212 सदस्यांची संख्या आहे. या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना निश्चित करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांची समिती होती. या समितीने प्रभाग रचना तयार करून दहा दिवसांपूर्वी (गुरुवार दि. 2) रोजी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेकडे पाठवले होते.
महसूल उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्या देखरेखीखाली तहसीलदारांकडून पाठविलेल्या प्रभाग रचना मसुद्यांची तपासणी करण्यात येवून ते विभागीय आयुक्त यांच्याकडे हे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहेत. आता विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा 17 मार्चला प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यावर हरकती-सूचना दाखल करण्यास 24 मार्चपर्यंत मुदत असून संबंधित प्रांताधिकारी 28 मार्चपर्यंत हरकती-सूचना सादर करता येणार आहेत. त्यावर 6 एप्रिलपर्यंत सुनावणी प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. त्यानंतर 17 एप्रिलपर्यंत प्रभागरचना अंतिम केली जाणार आहे. या प्रभाग रचनेची अंतिम प्रसिद्धी 5 एप्रिल रोजी होणार आहे.
67 ग्रामपंचायतींवर जानेवारीत प्रशासक
चालू वर्षी मुदत संपणार्या ग्रामपंचायतींपैकी जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी महिन्यांत संपली असून त्याठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेला आहे. यासह मुदत संपणार्या जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये नेवासा तालुका पाचेगाव, राहुरी तालुका सडे, चिचोंली, श्रीरामपुर तालुका उकलगाव, माळवडगाव, उंदिरगाव, फत्याबाद, निमगाव खैरी, कोपरगाव जेऊरकुंभारी, राहाता तालुका दाढ, वाकडी, संगमनेर आश्वी खु आणि आश्वी बु, शेवगाव तालुका मुंगी आणि बालमटाकळी या गावांचा समावेश आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
अकोले 27, शेवगाव 27, राहुरी 22, कोपरगाव 16, श्रीरामपूर 17, नेवासे 16, पाथर्डी 15, राहाता 11, श्रीगोंदे 9, नगर 9, पारनेर 8, संगमनेर 6, कर्जत 7,जामखेड 5 यांचा समावेश आहे.तेथील अधिकारी यांचा उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.