सुपा (वार्ताहर) -

ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने इच्छुकांना निवडीचे वेध लागले आहेत. सरपंच पदाच्या

निवडीला एकच दिवस उरला असून सदस्यांना घडतयं देवदर्शन तर काही चमत्कार घडू नये म्हणून पुढाकारी देव पाण्यात बुडवून आहेत.

ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होऊन 18 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर आठ दिवसांनी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघून आठ दिवस झाले. सरपंच पदाच्या निवडीची तारीख निश्चित झाली येत्या मंगळवारी, बुधवारी (दि. 9 व 10) सरपंच पदाच्या निवडी होणार आहेत. ज्या गटाकडे स्पष्ट बहुमत आहे ते निश्चिंत आहेत; परंतु ज्यांना काठावरचे बहुमत आहे. त्यांना मात्र आपले सदस्य सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. तर काही अपक्ष सदस्य मात्र दोन्ही थडीवर हात ठेऊन आहेत. सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि घोडेबाजाराला तेजी आली.

काही गावपुढार्यांनी रिस्क नको म्हणून आपले सदस्य सहलीवर पाठवले आहेत. सरपंच पदाच्या या घोडेबाजारात बर्याच सदस्यांना लक्ष्मी दर्शनाबरोबर देवदर्शनही होत आहे. बर्याच गावांत दोन प्रबळ दावेदारांच्यामध्ये तिसर्याचीच लॉटरी लागण्याच्या बेतावर आहे.

सुपा परिसरातील बर्याच ग्रामपंचायतींवर आमदार लंके समर्थकांचे बहुमत झाले आहे. यात हंगा ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक झाली असून तेथे आमदार लंके ज्याला सांगतील तो सरपंच होईल. सुप्यात आमदार लंके समर्थक माजी सरपंच राजू शेख यांच्या गटाला बहुमत आहे. तेथे आमदार निलेश लंके व राजू शेख यांना सरपंच ठरवताना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण येथे इच्छुकाची संख्या जास्त आहे. त्यामुळे आमदार लंके निष्ठावंतालाच आशिर्वाद देतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे. शहाजापूरमध्ये माजी सरपंच अण्णा मोटे यांच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने ते कुणाला संधी देतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल, वाळवणेत आमदार लंके समर्धक सचिन पठारे सरपंचपदी कुणाला संधी देतात की सरपंच पद आपल्यात घरात ठेवतात हे लवकरच कळेल. रांजणगाव मशिद येथेही राहुल शिंदे सरपंच पद आपल्या घरात ठेवतात की समर्थकाला संधी देतात हे त्यांच्या मनाच्या मोठेपणावर अवलंबून आहे. तर वाघुंडे येथे सत्तांतर झाले असल्याने सरपंचही नवीन असेल.

बर्याच गावांत काठावरील बहुमत आहे. एक जरी सदस्य गेला तरी सत्ता जाणार हे निश्चित. त्यामुळे बहुतांशी गावांनी सदस्यांना सहलीवर पाठवले आहे. महिला सदस्य असल्यावर त्यांच्या पतीलाही देवदर्शन घडत आहे. सहलीवर गेलेले सदस्य थेट निवडीच्याच दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात उतरणार आहेत.

एकंदरितच निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचे सरपंच निवडीकडे लक्ष लागले आहे. तर इच्छुकांना सरपंच पदाचे चांगलेच डोहाळे लागले आहेत.