ग्रामपंचायत स्तरावर प्रथमच गुलाबी सखी मतदान केंद्र - कोल्हे

ग्रामपंचायत स्तरावर प्रथमच गुलाबी सखी मतदान केंद्र - कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महिलांना निर्भयपणे शासकीय-निमशासकीय संकल्पनेत सहभाग देता यावा यासाठी देशाच्या निवडणूक आयोगाने लोकसभा-विधानसभा निवडणुकीत संपूर्ण भारतभर गुलाबी सखी मतदान केंद्राची संकल्पना राबवून त्यातून जनजागृती केली होती. त्याच धर्तीवर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर आणि माहेगाव देशमुख येथे गुलाबी रंगाचे सखी मतदान केंद्र रविवारी उभारण्यात आल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, सौ. रेणुका कोल्हे यांनीही सखी मतदान केंद्र संकल्पना जाणून घेतली. तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विजय बोरूडे यांनी सखी गुलाबी मतदान केंद्र संकल्पना विषद केली. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, दौलतराव जाधव यांनी शिंगणापूर, माहेगाव देशमुख सह 24 ग्रामपंचायतींच्या मतदान संरक्षण पोलीस बंदोबस्ताची माहिती दिली. शिंगणापूर येथील मतदान केंद्राधिकारी तथा तलाठी संदीप लहाने यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतिपदावर आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध योजना देशपातळीवर राबवत आहेत. देशाची आर्थिक घडी सुरळीत करण्यात अर्थमंत्री निर्मला सितारामन काम करत आहेत. नारीशक्ती जबाबदारीतून घेते भरारी, तालुक्यात महिला बचतगट चळवळ सध्या मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. दिल्लीत मुली-महिलांवर अत्याचार होतात ते कमी करण्यासाठी निर्भया संकल्पना देशभर राबविली जात आहे.

महिला आपल्या कामात कुठेही मागे नाहीत. ती जबाबदारीच्या जाणिवेतून तिच्याकडे सोपवविलेले कार्य नियमीत पार पाडत असते. ग्रामपंचायत सत्तेची दोरी आता अनेक ठिकाणी महिलांच्या हाती आहे. तेव्हा महिलांनी आपल्या गावाचा विकास यशस्वीरित्या साकारून तालुकापातळीवरील महिलांच्या अडीअडचणी, समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. गुलाबी सखी मतदान केंद्र आणि येथे असलेले निर्भय वातावरण नक्कीच 28 ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेत महिलांचा टक्का निश्चित वाढेल, असा विश्वास सौ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सरपंच सुनीता संवत्सरकर, भिमा संवत्सरकर, संजय तुळस्कर, शिवा सुपेकर, मंगेश गायकवाड, मुन्नाभाई पठाण, श्रीमती मोरे, श्रीमती लाड, श्रीमती दरवडे यांच्यासह पाच बुथवर पंचवीस महिला मतदान पदाधिकारी, पाच महिला पोलीस अधिकारी, महिला बचतगट सर्व भगिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी भिमा संवत्सरकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे यांनी केले. शिंगणापूर पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनींनी या सखी मतदान केंद्राचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. दिवसभर या मतदान केंद्रावर महिलांची लक्षणीय गर्दी होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com