अहमदनगर |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी तालुक्यात सुरू झाली आहे.

तालुक्यातील 216 प्रभागांमधून 583 सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी 14 डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून पहिल्याच दिवशी देहरे गावातून तीन उमदेवारी अर्ज दाखल झाले आहेत.

तालुक्यात 1 लाख 21 हजार 276 मतदार असून यात 63 हजार 898 पुरुष मतदार, तर 57 हजार 376 स्त्री मतदार आणि अन्य 2 मतदार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

31 डिसेंबरला छाननी तर 4 जानेवारी पर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान घेण्यात येणार असून सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानासाठी वेळ असणार असून 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

तालुक्याची निवडणूक प्रक्रिया ही नगर तहसील कार्यालय येथूनच नियंत्रित केली जाणार आहे. तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींसाठी तहसीलदार उमेश पाटील हे आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी तथा निवडणूक अधिकारी आहेत. त्यांनी 30 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असून 8 अधिकारी राखीव आहेत.

नामनिर्देशन प्रक्रिया सुलभ होणेसाठी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी तहसील कार्यालयात दोन हेल्पडेस्क उघडण्यात आले आहेत. तसेच आचारसंहिता कक्ष सुरू झाला असून त्याचे प्रमुख गटविकास अधिकारी आहेत.