उंबरे (वार्ताहर) -

राजकारण चार-पाच घरांसाठी न करता सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही करीत आलो आहोत. मात्र, विरोधकांकडे प्रत्येक निवडणुकीत

तेच घर आणि तेच उमेदवार असतात. आम्ही सर्वसामान्यांना न्याय देतो. केवळ निवडणुकीपुरतेच आपले दुकान उघडून गावाच्या विकासाचे फक्त आश्वासनांचे जुमले बांधून नागरिकांची दिशाभूल करून मतदान मिळविता येत नाही. वेगवेगळ्या योजनांमधून भरीव निधी आणून नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी केलेली विकासकामे दाखवून आम्ही मतदारांसमोर जात आहोत. त्यामुळेच विजयाची पूर्ण खात्री आहे, असे प्रतिपादन डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी केले.

वांबोरीतील ग्रामविकास मंडळाच्या बैठकीत उदयसिंह पाटील म्हणाले, ज्येष्ठनेते अॅड. सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परिसरात अनेक विकासकामांच्या माध्यमातून परिसरामध्ये दहा कोटींचा निधी आणला. त्यातील बरेचसे काम पूर्ण झाले असून काही कामांची मंजुरी मिळालेली आहे. मात्र,मतदारांसमोर केवळ आश्वासनांचे जुमले बांधण्याचा केविलवाणा खटाटोप विरोधकांकडून सुरू आहे. आशा थापाड्यांना जनता थारा देणार नाही. ग्रामविकास मंडळाचे 17 उमेदवार निवडून देतील, याचा मला विश्वास आहे.

यावेळी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भानुदास कुसमुडे, धनंजय केंद्रे, सुरज मकासरे, विकी मकासरे, विशाल मकासरे, राहुल बांबल, प्रमोद मकासरे, दादा साळवी आदी उपस्थित होते.