ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करुन ग्रामसंस्कृतीचे जतन करावे - राजेश परजणे

ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करुन ग्रामसंस्कृतीचे जतन करावे - राजेश परजणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यात येत्या 18 डिसेंबर रोजी 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या असून गावपातळीवर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सामोपचाराने सर्व निवडणुका बिनविरोध करुन ग्रामसंस्कृतीचे जतन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी, वडगांव, बक्तरपूर, हंडेवाडी, मोर्विस, शिंगणापूर, खिर्डीगणेश. धारणगांव, करंजी बुद्रूक, तळेगावमळे, खोपडी, भोजडे, पढेगाव, कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, देर्डे कोर्‍हाळे, डाऊच बुद्रूक, डाऊच खुर्द, चांदेकसारे, सोनेवाडी, राजणगांव देशमुख, वेस, सोयगांव, शहापूर, बहादरपूर, बहादराबाद या 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहेत. त्यादृष्टीने गावपातळीवर जोदार हालचाली सुरु झालेल्या आहेत.

गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी करोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला होता. त्यात आपल्याकडेही या महामारीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. शेती उत्पादनाबरोबरच ग्रामीण भागातील छोटे-मोठे व्यवसाय, उद्योगधंदे अडचणीत आले होते. परिणामी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अस्थिर होऊन लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यातून सावरत नाही तोच यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरीप पिके पूर्णपणे नष्ट होऊन शेती उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे.

शेतकरी अडचणीत सापडले आहेत. निवडणुकांवर अनावश्यक खर्च करण्याची परिस्थिती आज राहिलेली नाही. या सर्व बाबींचा विचार करुन ज्या-ज्या गावात निवडणुका लागलेल्या आहेत त्या गावातील कार्यकर्त्यांनी गावपातळीवर बैठका घेऊन निवडणुक बिनविरोध कशी करता येतील याबाबत सामोपचाराने निर्णय घेणे आज काळाची गरज निर्माण झालेली आहे.

निवडणुकांसाठी होणारा खर्च टाळून तो पैसा गावातील विधायक कामासाठी वापरला तर तो एक चांगला आदर्श ठरेल. चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. निवडणुकांच्या कालावधीत परस्परांवर होणार्‍या आरोप प्रत्यारोप व कलहामुळे गावातील शांतता व ग्रामसंस्कृती लयास जाणार नाही याची कार्यकर्त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रामसंस्कृतीचे जतन करण्यासाठी कार्यकत्यांनी गट-तट व हेवेदावे विसरुन निवडणुका बिनविरोध पार पाडाव्यात, असेही आवाहन श्री. परजणे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com