सुपा (वार्ताहर) -

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार समाप्तीला अवघे दोन दिवस उरले असल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. तर हॉटेल, धाबे गर्दीने

फुलले आहेत.

शुक्रवारी ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून जाहीर प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचार सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. उमेदवारांना तर झोपा नाहीच; परंतु सामान्य मतदारांनाही झोपून देत नाही. दिवस रात्र कार्यकर्ते, समर्थक भेटीला येत असतात एवढ्या वेळेस लक्ष असू द्या, असे म्हणत कधी न बोलणारे उमेदवार आज पाया पडताना दिसत आहेत. गाठी-भेटी, नाती-गोती, भाऊबंदकी सर्व गोतावळा याची जो तो गाठ बांधताना दिसत आहे. गाव, गल्ल्या, वाड्या-वस्त्या चकचकीत फोटो असलेल्या डिजिटलने सजल्या आहेत. मोठ मोठ्या निवडणुकांना लाजवेल असे डावपेज देखील आखले जात आहेत.

निवडणूक कुठलीही असो ती हॉटेल व्यावसायिकांसाठी पर्वणी असते. सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गेल्या महिना भरापासून हॉटेल व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. करोना संसर्गामुळे गेली 10 महिन्यांचा व्यवसाय भरून काढण्याची संधी हॉटेल व्यावसायीकांना आली आहे. हॉटेल व्यतिरिक्तही वाड्या-वास्त्यांवर, रानमळ्यांनी जेवणावळीच्या पंगती उठू लागल्या आहेत. नुसत्याच जेवणावळीवर काम थांबत नाही. तर त्यासाठी दारू खुप जरुरी आहे म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत दारुचा चांगलाच महापूर वाहताना दिसत आहे.

दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने खुप घडामोडी घडत आहेत. पाकिटाची देवाण-घेवाण गुप्त होत आहे. तर आश्वासनांचा वर्षाव होताना दिसत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने काही आपल्या राजकीय भवितव्याची पायाभरणी करत आहेत. तर काही आपणच किंगमेकर आहे. हे सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. यामुळे सर्वच गावांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकंदरित शुक्रवारी होणार्या मतदानाला अवघे दोन दिवस उरल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे.