
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या सजग आणि प्रतिष्ठेच्या उक्कलगाव ग्रामपंचायतीची निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत असून 16 ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.त्यामुळे निवडणूकपूर्व हालचालींनी वेग घेतला असून गुप्त बैठकांचा व उमेदवार चाचपणीचा सिलसीला सुरू आहे.
ग्रामपंचायतीचे एकूण पाच प्रभाग असून प्रत्येक प्रभागात तीन याप्रमाणे एकूण 15 उमेदवारांसह लोकनियुक्त सरपंच पाच वर्षांसाठी निवडून द्यावयाचे आहेत.सरपंचपद अनुसूचीत जमातीच्या महिलेसाठी राखीव असून प्रभाग क्र.1-सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ना.मा.प्रवर्ग महिला प्रभाग क्र.2 -सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती पुरुष प्रभागक्र.3 -सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, अनुसूचित जमाती पुरुष प्रभाग क्र.4 -सर्वसाधारण, ना.मा.प्रवर्ग महिला, अनुसूचित जाती महिला प्रभाग क्र.5-सर्वसाधारण महिला, ना.मा.प्रवर्ग पुरुष, अनुसूचित जमाती महिला याप्रमाणे प्रभागनिहाय आरक्षण आहे.
गत पंचवार्षिकला माजी सभापती इंद्रनाथ पा. थोरात याच्या नेतृत्वाखाली समाज सेवा मंडळ व अशोकचे माजी चेअरमन रावसाहेब पा.थोरात आणि माजी सभापती आबासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हरिहर एकता आघाडी अशी लढत होऊन हरिहर एकता आघाडीला लोकनियुक्त सरपंच पदासह 10 तर समाजसेवा मंडळाला 5 जागा मिळाल्या होत्या. सद्य स्थितीत ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त असून पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. रोटेशन पध्दतीने ठरलेल्या उपसरपंच पदावर संधी न मिळाल्याने अनेक सदस्य खासगीत आपल्या भावना व्यक्त करत असून काहींनी उघड पवित्रा घेतला आहे. असे असले तरी सत्ताधारी पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडून मतांचा जोगवा मागतील तर विरोधक या कामांतील अनियमीतता व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार आहेत.
मतदारांना मात्र रस्ते, पाणी, वीज या मुलभूत प्रश्नांची गरज असून स्वच्छ, सुंदर व दहशतमुक्त उक्कलगाव हीच सामान्य उक्कलगावकरांची अपेक्षा आहे.पटेलवाडी गावठाण हा मोठा भाग या ग्रामपंचायती अंतर्गत येत असून आम्हाला दिलेले बहुमजली घरकुलाचे, स्वतंत्र रेशन दुकानाचे आश्वासन हवेतच विरले का? त्याचा जाब आम्ही समोरासमोर विचारू, असे मतदार दुकान-पारावर बोलत आहेत.सकाळी दूध डेअरी, चहाचे हॉटेल, किराणा दुकान येथे आवंदा याची जिरवू, त्याला उचलून धरू, तिसरी आघाडी करू अशा गप्पा रंगायला सुरुवात झाल्याने आपसुकच लोक टोळक्या टोळक्याने बसायला लागले आहेत.
गतवर्षी झालेली सोसायटी निवडणूक व इतर घडामोडी पहाता गावात प्रबळ दोन गटांतच पारंपरिक लढत होणार असल्याचे लोकांचे ठाम मत असून सद्य स्थितीतील चित्र आणि अनुभवही तसाच असल्याने उक्कलगावात अद्याप तरी तिसरी आघाडी उदयास आलेली ऐकिवात नाही.