कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी सांगवी भुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत

काळे, कोल्हे, जाधव यांनी युती करून नऊ पैकी सहा जागा बिनविरोध करण्यात यश मिळविले आहे. ऐनवेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे तीन जागांसाठी चुरशीची लढत होत आहे. या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे

या ग्रामपंचायतीत राजेंद्र जाधव यांची एकहाती सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र बापू जाधव यांनी आमदार काळे यांचा उघड प्रचार करून आपली ताकद पणाला लावून आमदार काळे यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले. आमदार काळे यांनी या उपकाराची परतफेड म्हणून या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना बोलावून सर्वांनी राजेंद्र बापू जाधव यांना मदत करण्याचे आवाहन केले.

कोल्हे गटानेही जाधव गटाला पाठिंबा दिला. तालुक्यातील राजकारणाचा मोठा प्रभाव या निवडणुकीत पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त आंदोलने, उपोषणे या गावात झालेली आहेत.

आदर्श गावाचा बुरखा परिधान केलेल्या सत्ताधार्यांनी ग्रामस्थांना कधीही विश्वासात न घेता केलेला कारभार, गावातील महत्त्वाच्या पदांवर निकटवर्तीयांना स्थान देणे, मंजूर असलेल्या रस्त्यांचे निधी इतरत्र वापरणे, गावातून जे कोणी विरोध करतील त्यांना जमिनीच्या वादात अडकवून पोलीस स्टेशन, कोर्टकचेर्या यामध्ये अडकून चकरा मारायला लावणे, खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढविणे यासारखे गंभीर प्रकार या गावांमध्ये होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या ह्या तीन उमेदवारांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

मतदार आता या निवडणुकीत आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.