दादासाहेब निकम

सलाबतपूर -

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे गावपुढार्यांचे मनसुबे फोल ठरल्याने आता

आखाडा चांगलाच रंगला असून प्रचाराची धुळवड उडायला सुरूवात झाली आहे. साम, दाम, दंड, भेद आणि भावनिक नाट्याचाही कहर पाहण्यास मिळणार असल्याने मतदारांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे.

गटातटाबरोबरच भावकीच्या राजकारणालाही चांगलाच रंग चढला आहे. गावपुढार्यांना आम्हीच कसे किंगमेकर आहोत हे दाखवण्याची घाई झाली आहे. त्यामुळे उमेदवाराबरोबर गावच्या संसदेची सत्ता काबिज करण्यासाठी गावपुढार्यांनी कंबर कसल्याचे पाहवयास मिळत आहे. उमेदवारांची सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात झाली आहे. मात्र औपचारीक प्रचाराचा नारळ फोडणे बाकी असून त्याची तयारीही सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वैयक्तिक भेटीगाठी आधीपासूनच सुरू असून अनेक उमेदवारांनी चाचपणीही केली आहे.

अर्ज भरण्याच्या मुदतीत एकूण 43 अर्ज दाखल झाले होते. छाननीत एक अर्ज बाद झाला तर प्रभाग एकमध्ये सर्वसाधारण महिलाच्या राखीव जागेवर एकच अर्ज राहिल्याने एका गटाची एक जागा बिनविरोध झाली आहे. तर अद्याप दहा जागांसाठी अपक्षांसह 21 जण निवडणूक आखाड्यात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

निवडणूक काळात राजकिय वातावरण संवेदनशिल असले तरी राजकिय डावपेच व राजकिय कुरघोड्या मात्र सुरूच असतात. प्रभाग एक, दोन व चारमध्ये भावकीचे राजकारण चांगलेच रंगले आहे. तर काही उमेदवार नात्यागोत्याच्या मैत्रीसंबंधाच्या भरवशावर आपले नशिब आजमावू पाहत आहेत. काहीजण जुन्या राजकारणाला उजाळा देत मागचा वचपा काढण्यासाठी समोर न येता आतून सहकार्य करत राजकारणातही खाण्याचे आणि दाखवण्याचे दात कसे असतात हे दाखवून देत आहेत. याचे उत्तम उदाहरण पहायला मिळाले तर नवल वाटू नये. त्यामुळे या आतल्या गावगुंडीच्या राजकारणात काहींसाठी जमेची बाजू ठरणार असली तरी गावपुढार्यांची डोकेदुखी ठरून राजकिय समिकरणे बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या आधीच्या निवडणुकीपेक्षा या वेळच्या निवडणुकीचा रंग जरा वेगळाच आहे.

तर दुसरीकडे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून कोणता उमेदवार किती सरस? कोण कशी राजकिय खेळी खेळणार? कोण बाजी मारणार? कोणत्या गटाचे पारडे जड ठरणार? अशा अनेक प्रश्नांवर खमंग चर्चा सुरू आहे.