आता प्रतिक्षा वाघाचा आखाडा ग्रामपंचायत निवडणुकांची !

कोण होणार पहिला सरपंच? कोण होणार सदस्य? ग्रामस्थांची प्रश्नावली सुरू
आता प्रतिक्षा वाघाचा आखाडा ग्रामपंचायत निवडणुकांची !
ग्रामपंचायत

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

जिल्ह्यासह राहुरी तालुक्यातही ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून प्रतिक्षा करीत असलेल्या वाघाचा आखाडा या ग्रामपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीची अद्यापही चाहूल लागलेली नाही. प्रभागनिहाय रचनेचे काम पिछाडीवर पडल्याने ही निवडणूक रखडली असून वाघाचा आखाडा ग्रामस्थांना या निवडणुकीची प्रतिक्षा लागली आहे. वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीच्या राजकीय इतिहासात येथील पहिला सरपंच कोण होणार? पहिले सदस्य कोण होणार? याबाबत ग्रामस्थांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, आता वाघाचा आखाडा व तांदुळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय रचनेचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे आता निवडणुका होणार असल्याच्या कल्पनेनेच ग्रामस्थ सुखावून गेले असून काही इच्छुक उमेद्वार कामालाही लागले असल्याची चर्चा होत आहे. वाघाचा आखाडा सरपंचपदाची माळ पहिल्यांदा कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबतही उत्कंठा ताणली गेली आहे.

तांदुळवाडी या ग्रुप ग्रामपंचायतमधून वाघाचा आखाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत दि.1 मार्च 2020 रोजी अस्तित्वात आली. त्यानंतर दोन्ही ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान शासनाचा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबतचा आदेश प्राप्त झाला. यावेळी 2020 ते 2025 या कालावधीसाठी प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे पुन्हा प्रभाग रचना व आरक्षण जाहीर होणे अपेक्षित असतानाच मार्च 2020 च्या अखेरीस करोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणुकीला स्थगिती दिली. तसेच मुदत संपलेल्या तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. करोनाच्या पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जानेवारी 2021 मध्ये तालुक्यातील 44 ग्रामपंचायत निवडणुकांचा टप्पा पार पडला.

वाघाचा आखाडा व तांदुळवाडी येथे नव्याने प्रभाग रचना व आरक्षण नसल्याने या दोन्हीही ग्रामपंचायती निवडणुकीपासून वंचित राहिल्या. फेब्रुवारी 2021 मध्ये या दोन्ही गावांचा प्रभाग तयार करण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. मात्र, पुन्हा करोनाची दुसरी लाट सुरू झाली. अन् पुन्हा निवडणूक आयोगाने या प्रक्रियेला पूर्णविराम दिला. त्यामुळे गेल्या एक वर्षांपासून तांदुळवाडी व वाघाचा आखाडा ही दोन गावे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. निवडणुकांची वाट बघत असतानाच तांदुळवाडी गावाचे प्रशासक व पंचायत समितीचे विस्तार अधिकार्‍यांचे अपघाती निधन झाले.

त्यापूर्वी ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे नागरिकांची कामे प्रलंबितच राहिली. नवीन रचनेनुसार तांदुळवाडी गावाची लोकसंख्या 2011 च्या जणगणनेनुसार 4 हजार 665 आहे . त्यामुळे येथे 13 सदस्य तर वाघाचा आखाडा गावाची लोकसंख्या 1 हजार 495 असल्याने येथे 7 सदस्य राहणार आहेत. आता नवीन प्रशासक व ग्रामसेवक यांची नेमणूक झाली आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेक दिवसांचा कालावधी गेला. आता शासनाने निबर्ंध शिथील केल्याने आता निवडणूक आयोग नक्कीच या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी बाळगली आहे. एकीकडे प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा सुरू झाला असतानाच दुसरीकडे मात्र, काही इच्छुकांनी जोरदारपणे निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.

Related Stories

No stories found.