
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
पुणतांबा-रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन गावात सध्या राजकीय नेत्यांनी गाठीभेटी, खासगी कार्यक्रमांना हजेरी लावणे तसेच विशेष पदावर निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार करणे पाच वर्षांत ज्यांनी ज्या भागाला भेटी दिल्या नाहीत त्या भागात जाऊन ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेणे त्यांची आस्थेने चौकशी करणे असे उपक्रम सुरू केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये वेगळीच चर्चा असून आता निवडणुका जवळ आल्याची जाणीव ग्रामस्थांना होऊ लागली आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आम्हीच तुमचे सर्वेसर्वा आहेत असे आता ऐकावे लागेल, असे अनेकांनी खासगीत चर्चा करताना स्पष्ट केले. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने नुकताच काही व्यक्तींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र पुणतांबा येथील तीन सिने कलाकरांना या कार्यक्रमाचे साधे आमंत्रण नव्हते.
ग्लोबल आडगाव या चित्रपटात ज्यांनी काम केले त्या गावातील तीन कलाकारांचा यथोचित सत्कार गावातील अनेकांनी यापूर्वीच केला आहे. या चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली. जगाने दखल घेतली पण गावाला दखल घेण्याची का गरज वाटली नाही याबाबत उलट सुलट चर्चा आहे. राजकारण डोळ्यासमोर ठेऊन जर काही बाबी जाणीवपूर्वक केल्या जात असतील तर ग्रामस्थ वेगळा निर्णय घेतील, असा इशारा अनेक ग्रामस्थांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिला आहे.