195 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आठवडाभरात ?

गावोगावी मोर्चेबांधणी सुरू || निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लक्ष
195 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आठवडाभरात ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम चालू आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सुत्रांनी दिली. या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरील तयारी पूर्ण झालेली असून आता केवळ निवडणूक आयोगाकडून याठिकाणी निवडणुकीची घोषणा होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, निवडणुका होणार्‍या ग्रामपंचायतीमधील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून मार्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील 198 ग्रामपंचायतीचा सरपंचासह सदस्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. यामुळे याठिकाणी प्रशासक नियुक्त आहे. याठिकाणी निवडणुकीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया जिल्हा निवडणूक विभागाने पूर्ण केलेली आहे. आता केवळ राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणुकांच्या घोषणेकडे संबंधीत ग्रामपंचायतीचे लक्ष आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 198 ग्रामपंचायतींवर काही महिन्यांपासून प्रशासकीय राज आहे. या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुकांसाठीची तयारी पूर्ण झालेली असून आता केवळ निवडणुकांच्या घोषणेची सर्वांना प्रतिक्षा आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. मुदत संपलेल्या या 198 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षण आणि मतदार यादीची घोषण यापूर्वीच झालेली आहे. यासह थेट सरपंच पदासाठी जनतेतून निवडणूक होणार असल्याने त्या ठिकाणी या पदाचे आरक्षण काढण्यात आलेले आहे.

आधी पावसाळा आणि त्यानंतर गणेशोत्सव यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रखडल्या होत्या. मुदत संपलेल्या 198 ग्रामपंचायतीपैकी नगर तालुक्यातील वारूळवाडीसह अन्य दोन गावांचा समावेश नगर पालिकेत करण्यात येत असल्याची अधिसुचना राज्य सरकारने काढलेली असल्याने ही गावे वगळून आता 195 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. निवडणूका होणार्‍या ग्रामपंचायतीमध्ये राजकीय वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सावत त्याची प्रचिती आली. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी चालू आठवड्यात निवडणुकांची घोषणा होणार असल्याची शक्यता निवडणूक विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

झेडपी, पंचायत समितीचे काय ?

महाराष्ट्राची मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळख असणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका सुमारे दीड वर्षापासून रखडलेल्या आहेत. राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि ओबीसी आरक्षण यासह अन्य कारण यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीची तयारी भारत निवडणूक आयोगाने सुरू केली असून जानेवारी 2024 ला मतदार यादी जाहीर होणार आहे. या सर्व गदारोळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

या बड्या ग्रामपंचायती

आश्वी बुद्रुक, उक्कलगाव, घारगाव, पोहेगाव, उंदीरगाव, चितळी, वारी, दाढ बुद्रुक, पिंपरी निर्मळ, दत्तनगर, नाऊर, वाकडी, फत्त्याबाद, सडे, देसवंडी, वाडेगव्हाण, कानूर पठार, विसापूर, कोळगाव, आरणगाव, देऊळगाव सिद्धी, बारदरी, पैठण, घोटी, गुंजाळवाडी, कुंभाळणे, माळवाडी, जवळके अशा 195 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com