सुपा |वार्ताहर| Supa

येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार गेल्या महिनाभरापासून सुरू होता. तो बुधवारी (दि. 13) सायंकाळी 5.30 वाजता थंडावला.

मात्र बुधवारी रात्रीपासून समक्ष गाठी-भेटीवर रात्रंदिवस भर दिला जात असल्याचे चित्र दिसून आले.

पारनेर तालुक्यात 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागू झाला होता. यात तालुक्यात 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर 79 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून धडधडणार्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही थंडावल्या. प्रचारफेर्या, चौकसभा, ग्रामप्रदक्षीणा, गाठी-भेटी यांनी गावागावांतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

बुधवारी सांयकाळी जाहीर प्रचार संपला असला तरी येणार्या दोन रात्री व एक दिवसात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यात जेवणावळीसह आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात होत आहेत. यात लोकशाहीला काळीमा फासणार्या घटना घडत आहते. यात पाकीटाची देवाण-घेवाण होत आहे. तर काही गावांनी मताचा बाजार फुटला आहे, अशी चर्चा कानावर येत आहे.

काही गावांचा यापुर्वीचा अनुभव असा आहे की, मतदार काहीतरी पदरात पडत नाही तोपर्यंत घराबाहेर पडत नाही. उमेदवार येऊन मनधरणी केल्यावर मतदार मतदान केंद्र शोधतात अशाही घटना घडतात.प्रचार समाप्त होताच फोडाफोडी, नाते-गोते, जुळवा-जुळवीच्या राजकारणाला वेग आला आहे. रोजच्या त्याच त्याच भेटी तेच तेच बोलणे याला सामान्य मतदार वैतागून गेला आहे.