सात्रळ |वार्ताहर| Satral

राहुरी तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ऐन कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण गरमागरम झाल्याने निवडणुकीची हवा ‘टाईट’ झाली आहे.

या निवडणुकीत अनेक प्रतिष्ठितांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. निवडणुकीसाठी आता केवळ 22 दिवसांचा अवधी राहिल्याने राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

दरम्यान, निवडणुकीनंतरच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे.

राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या रामपूर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. कडाक्याच्या थंडीतही गावातील चौका-चौकांत, वाडी-वस्तीवर निवडणुकीच्या गप्पांनी राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. गावपुढारी उमेदवारांच्या भेटीगाठी घेत आपापले अंदाज लावीत आहेत.

त्यात निवडणूक कार्यक्रम संपल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने प्रत्येक उमेदवारास स्वत:ला सरपंचपदाचा दावेदार समजून निवडणुकीच्या आखाड्यात उतरावे लागणार आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी गावपुढार्यांनी कंबर कसली आहे.

असे असले तरी निवडणूक मात्र, विकासाच्या मुद्यावर लढवावी लागणार आहे. मागील पंचवार्षिकमध्ये गावाला एक रुपयादेखील आमदार-खासदार किंवा इतर स्थानिक विकास निधी सत्ताधार्यांना आणता आला नाही. तसेच आदिवासींचे एकही घरकुल पाच वर्षांत झालेले नाही. गावातील मुख्य रस्ता तसेच शिव रस्ते अतिशय खराब झालेले आहेत.

ग्रामपंचायतीस स्वत:च्या कार्यालयासाठी इमारत नाही. यासह पिण्याचे शुध्द पाणी, इतर गोरगरीब जनतेची घरकुले प्रलंबित आहेत. गावातील शेतशिवार रस्त्यांचे अनेक वाद राजकीय आकसापोटी सुरू असल्याने गावातील तंटे न्यायालयात जात आहेत. या सर्व बाबींचा प्रभाव या निवडणुकीत निश्चित पाहवयास मिळणार आहे. मतदार मात्र, तरुण उमेदवारांना संधी देऊन परिवर्तन व्हायला पाहिजे, अशी भावना खासगीत व्यक्त करीत आहेत.

आता ग्रामपंचायतीमध्ये सत्ताबदल होऊन परिवर्तन होते की, पुन्हा सत्ताधारीच सत्तेमध्ये येतात? हे सर्व काही येत्या 15 तारखेला होणार्या मतदानाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.