ग्रामपंचायत निवडणुकीची आ. पवार यांची पहिली परीक्षा

तालुक्यात राजकीय रणधुमाळी सुरू
आ. रोहित पवार
आ. रोहित पवार

कर्जत |वार्ताहर| Karjat

तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आ. रोहित पवार पहिली परीक्षा कशी देणार याकडे केवळ मतदारसंघाचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होताच तालुक्यात राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून 56 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुक्यातील बहुसंख्य राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या ग्रामपंचायतींचा या निवडणुकीमध्ये समावेश आहे.

ग्रामपंचायतींची निवडणूक ही सर्वात अवघड निवडणूक समजली जाते. आ. पवार कर्जत-जामखेड मतदार संघांमधून एक वर्षांपूर्वी आमदार होऊन विधानसभेत निवडून गेले आहेत. सेलिब्रिटी आमदार म्हणून ते राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत. शरद पवार यांचे भावी वारस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

या पार्श्वभूमीवर आमदार झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक हा त्यांचा पहिला पेपर आहे. या परीक्षेमध्ये ते किती मार्क मिळवतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जात नसली तरी त्या त्या गावातील प्रमुख कार्यकर्ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात.

यामुळे जो गटबाजी मारेल तो कोणत्यातरी पक्षांशी संबंधित असतो. यामुळे आपोआप ग्रामपंचायत कोणत्या पक्षाकडे गेली हे समजून येते. तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या बहुसंख्य ग्रामपंचायती आहेत. यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com