संजय कोळसे

कोल्हार -

कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता महाविकास आघाडी विरुद्ध भाजपाप्रणीत जनसेवा मंडळ अशी दुरंगी लढत होताना

प्रथमदर्शनी दिसते. दोन्ही गटांनी तशी जंगी तयारी केली. निदान उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यावरुन तरी तसे चित्र दिसते. मात्र उद्या 4 जानेवारीला अर्ज माघारीच्या दिवशी रणसंग्रामात एकमेकाविरुद्ध खरंच तोफा धडकणार का? किंबहुना पडद्यामागून गुप्त मसलती होऊन पुन्हा सहमती एक्सप्रेस धावेल का ? यावर फैसला होईल. याबाबत चर्चेला उधाण आले असून उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

राहाता तालुक्यात उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यामध्ये कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूरने उच्चांक गाठला. निवडणूक रिंगणात कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी तालुक्यात सर्वाधिक 117 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर त्याखालोखाल भगवतीपूर ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी तब्बल 98 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज छाननीत या सर्व उमेदवारी अर्जातून कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच डॉ. संजय खर्डे यांचा केवळ एकच अर्ज बाद झाला.

गावामध्ये एकोपा आणि सलोखा टिकावा असा नारा देत दहा वर्षापूर्वी कोल्हार भगवतीपुरमध्ये विखे पा. आणि खर्डे पा. गटामध्ये सहमतीचे राजकारण सुरू झाले. मात्र यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहमतीला तडा जाऊन तिलांजली वाहिली जाते की काय ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दोन्ही गटांनी यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन्ही गटाने लढत होणारच यादृष्टीने युद्धपातळीवर आपापल्या गटांचे उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले. कोठेही बेसावधपणा अथवा गाफीलपणा दिसून आला नाही. निवडणूक झालीच तर आपली बाजू कमकुवत ठरू नये, याकरिता दोन्ही गावातील दोन्ही गटांनी कोठेही कसूर ठेवला नाही. अर्थात हा एक सहमतीपुर्वीच्या दबावतंत्राचा भाग असू शकतो.

निवडणूक लढली जाणार की पुन्हा दिलजमाई होऊन बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार यासंबंधी दोन्ही गटांचा कानोसा घेतला असता, आमची पूर्ण तयारी सक्षमपणे झाली असल्याचा दावा दोन्ही गट करीत आहेत.

कार्यकर्ते भलतेच जोमात आहेत. मात्र मतदारांना फारसे स्वारस्य दिसून येत नाही. अर्ज माघारीसाठी उद्या सोमवारपर्यंत वेळ शिल्लक आहे. काल शनिवारपासून गावात हालचालींना वेग आल्याचे दृष्टीपथास येत आहे. तशी कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची लगबग आणि धावपळ दिसून येते. गावपातळीवर खलबतांना ऊत आला आहे. बिनविरोध निवडणुकीच्या अनुषंगाने किमान एकदा तरी बोलणी होणार हे मात्र नक्की. त्यादृष्टीने आजचा रविवार महत्वाचा ठरेल.

दोन्हीगटप्रमुख नेत्यांमध्ये काय खलबत होतात ? जागावाटपाची बोलणी होते किंवा नाही ? बोलणी झालीच तर त्यावर एकमत होते की नाही? कुणाची वर्णी लागते ? यावर उद्या सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी शिक्कामोर्तब होईलच. तशी चाचपणी सुरु असणार हेदेखील नाकारता येत नाही. यंदाच्या निवडणूकीला कोणती दिशा मिळते ? याकडे दोन्हीगावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अर्ज माघारीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांची तसेच अपक्ष उमेदवारांची मनधरणी करावी लागणार हे ओघाने आलेच. त्यामुळे दोन्ही गावाच्या दोन्ही गटांच्या गावपुढार्यांची डोकेदुखी वाढणार.

यदाकदाचित निवडणूक रणधुमाळीचा बिगुल वाजलाच तर मात्र टक्कर चुरशीची होईल हे निश्चित. संपूर्ण राहाता तालुक्यात येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार. येथून मागचा अनुभव असाच आहे. दोन्ही गट गावपातळीवर तुल्यबळ आहेत. त्यामुळे तगडे उमेदवार व कार्यकर्ते दोन्ही बाजूला आहेत. मतदारांचा कौल कुणाकडे झुकेल हे आत्ताच सांगणे घाईचे ठरेल. उद्यापर्यंत वेट अँड वॉच करावा लागेल.