करंजी (वार्ताहर) -

पाथर्डी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली असून मिरी, करंजी जिल्हा परिषद गटाचे सदस्य दिवंगत

अनिलराव कराळे यांचे गाव असलेल्या कामात शिंगवेत ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अनेक जाणकारांकडून शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र या गावातही दोन सख्ख्या बहिणींसह दोन जाऊबाई एकमेकींच्या विरोधात उभा राहिल्याने या गावात देखील नात्यागोत्याची लढाई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून लक्षवेधी ठरणार आहे.

गेल्या 15 वर्षांपासून ज्या गावात ग्रामपंचायतीसह सेवा संस्थेचीसुद्धा निवडणूक बिनविरोध होत होती. त्या आदर्शगाव पारेवाडीमध्ये देखील यावेळी निवडणूक लागली आहे. या गावातही तरुण वर्ग निवडणुकीत पुढे आल्याने सत्ताधारी गटापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लोहसर गावातही मागील काही दिवसांपूर्वी सरपंचाने गावात हाणामार्या केल्यामुळे सरपंचालाच बरेच दिवस तुरुंगात जाऊन बसण्याची वेळ आल्याने या गावातही राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. हुकूमशाही मोडित काढण्यासाठी विरोधकांनी सत्ताधारी गटापुढे कडवे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे.

मोहोजखुर्द येथे दोन्ही गटाची प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली असून यामध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख भारत वांढेकर व संतोष पिसे दोघे बिनविरोध निवडून आले आहेत. चेअरमन गहीनिनाथ खाडे गटाचे मच्छिंद्र खाडे, पार्वतीबाई रघुनाथ खाडे हे दोन सदस्य बिनविरोध निवडून आल्याने या गावातही विरोधकांना मोठा कस लावावा लागणार आहे.

खांडगाव जोहारवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जोहारवाडी प्रभागातून सरपंच कविता मच्छिंद्र सावंत व मुक्ताबाई अशोक वांढेकर या दोन महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर खाडगाव येथून अशोक भगवान गायकवाड यांची बिनविरोध म्हणून वर्णी लागली आहे. खांडगावकरांना सरपंचपद राखण्यासाठी या निवडणुकीत मोठी कसरत करावी लागणार आहे. तर जोहारवाडीतून दोन जागा बिनविरोध करून चेअरमन मच्छिंद्र सावंत गटाने सरपंचपदाचा मार्ग सुकर केला आहे.

भोसे गावात देखील प्रमिला विलास टेमकर व शंकर सुभाष टेमकर हे दोन सदस्य बिनविरोध झाल्याने या गावात देखील विरोधकांची निवडणुकीपुर्वीच हवा गुल झाल्याची चर्चा सुरू झाल्याने विरोधी गटाला उर्वरीत जागांसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य दिवंगत अनिलराव कराळे यांच्या निधनानंतर या गावात त्यांचे समर्थक व पुर्वाश्रमीचे विरोधक यांच्यात एकमत न झाल्याने या गावात निवडणुकीची रंगत सुरू झाली आहे. सुवर्णा सतीश कराळे व रोहिणी पोपट कराळे या दोन्ही सख्ख्या बहिणी सर्वसाधारण महिला या जागेसाठी वॉर्ड क्रमांक दोनमधून एकमेकीच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. वैशाली संजय पाटेकर व सरला राजेंद्र पाटेकर या दोन्ही जाऊबाई वॉर्ड क्रमांक 3 मधून एकमेकीच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तर महादेव लाला बर्डे व मुरलीधर यादव पिंपळे हे दोन मेहुणे एकमेकांच्या विरोधात वॉर्ड क्रमांक चारमधून निवडणूक लढवत आहेत.

तसेच बाप्पू भानुदास कराळे व गौतम संपत कराळे हे दोघे चुलते-पुतणे वॉर्ड क्रमांक दोनमधून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. कामत शिंगवेत ग्रामपंचायत निवडणूक नात्यागोत्यात गुरफटलेली दिसत असून अगदी रक्ताचे नातेच या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकल्याने सुरूवातीला बिनविरोध होईल, अशी वाटणारी ही निवडणूक आता लक्षवेधी ठरणारी वाटत आहे.