बेलापूर (वार्ताहर) -

येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचला असून सत्ताधारी जनता विकास आघाडी आणि गावकरी

मंडळ यांच्यात सरळ चुरशीची लढत होत आहे. तर काही प्रभागांत स्वतंत्र उमेदवारांनी समोर मोठे आव्हान उभे केल्याने रंगत आणखी वाढली आहे.

दोन्ही बाजूचे नेतेमंडळी, उमेदवार आणि कार्यकर्ते गावातील घर ना घर पिंजून काढीत आहेत. त्यामुळे एरवी ओस वाटणार्या व वाड्यावस्त्यांवर मोठी वर्दळ वाढली आहे. सत्ताधार्यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कारभाराचा पंचनामा विरोधक करीत आहेत. तर विरोधकांच्या आरोपांचे खंडन करून त्यांनी विकास कामात आणलेले अडथळे आणि केलेल्या विकास कामांची तसेच भविष्यात करावयाच्या प्रलंबित कामांची चर्चा सत्ताधारी मतदारांशी करीत आहेत.

गावातील प्रत्येक प्रभागांत स्थानिक नेते,उमेदवार आणि कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करून सवाद्य प्रचारफेर्या काढीत आहेत. त्यात महिलांचीही संख्या मोठी आहे. तसेच स्थानिक नागरी प्रश्न आणि विकासकामांवरही कॉर्नर सभांमधून लक्ष वेधून घेतले जात आहे.

यावेळी सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत असल्याने पारंपरिक प्रचाराच्या पद्धतीला हायटेक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. तसेच छापील आवाहन पत्रासाठी सर्वत्र महागड्या ग्लेझ पेपरवर आकर्षक डिजिटल रंगीत छपाई तंत्राचा वापर केला आहे.

पॅनलच्या उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवारही प्रचारात काही ठिकाणी चांगलेच आघाडीवर असल्याने पहिल्या तीन प्रभागांत तसेच प्रभाग पाच आणि सहामध्ये राजकिय गरमागर्मी वाढली आहे.अपक्ष उमेदवारही कंबर कसून प्रचारासाठी भाऊगर्दी घेऊन मैदानात उतरले आहेत. त्यामुळे काही जागांवर चांगलीच रंगत वाढली. हा रुसला.. तो फुगला.. त्यांची नाराजी काढून त्यांना आपापल्या पारड्यात आणण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. काही ठिकाणी तर चक्क पुढच्या निवडणुकीत उमेदवारीचा शब्द देऊन वेळ मारून नेली जात आहे. जनता विकास आघाडीचे नेतृत्व पं. स. सदस्य अरुण पा. नाईक, जनता आघाडी प्रमुख रवींद्र खटोड, बाजार समिती संचालक सुधिर नवले, माजी सरपंच भरत साळुंके हे करीत आहेत. गावकरी मंडळाचे नेतृत्व जि. प. सदस्य शरद नवले, अशोक कारखाना संचालक अभिषेक खंडागळे, भाजपचे सुनील मुथा व शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे करीत आहेत.