अस्तगाव (वार्ताहर) -

अस्तगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रंगत वाढणार आहे. विखे गटा अंतर्गत जनसेवा मंडळ व जनसेवा विकास मंडळ

या दोन मंडळात प्रमुख लढाई होत आहे. युवा मंडळही काही जागा लढवत आहे.

सुरुवातीला अस्तगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु होत्या. त्यामुळे उमेद्वारी अर्ज दाखल करण्यापासून काही जण बाजुला राहिले. परंतु येथील युवकांनी पॅनलमध्ये संधी मिळत नसल्याच्या कारणावरुन युवा मंडळाची स्थापना करुन काही उमेदवार उभे केले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल ही चर्चा थांबली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी त्यासाठी राष्ट्रवादीलाही सामावून घेण्याची तयारी जनसेवा मंडळातील काही मंडळींनी ठेवली होती. उमेदवारी अर्ज माघारीत प्रभाग क्रमांक 3 हा दोन जागा असणारा प्रभाग बिनविरोध झाला. निवास त्रिभुवन व विखे गटास पाठिंबा दिलेल्या सुनिता लोंढे या बिनविरोध निवडल्या गेल्या तर प्रभाग क्रमांक चार मध्ये गायत्री वाल्मिक जेजुरकर या काँग्रेसच्या उमेदवार बिनविरोध झाल्या. 17 पैकी 3 जागा बिनविरोध झाल्या. आता उर्वरित 14 जागांसाठी 34 उमेद्वार निवडणूक रिंगणात आहेत.

प्रभाग 1 मध्ये जनसेवा मंडळा विरुध्द जनसेवा विकास मंडळ अशी लढत होत आहे. या प्रभागात अस्तगाव युवा ग्रामविकास मंडळाची जनसेवा विकास मंडळाबरोबर युती आहे. जनसेवाचे सुर्यकांत जेजुरकर याची लढत जनसेवा विकासच्या देविदास जेजुरकर यांच्याबरोबर होत आहे तर सतीश आत्रे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. जनसेवाचे पवन आरंगळे यांची लढत जनसेवा विकासच्या भाऊसाहेब नळे यांच्याशी होत आहे. या प्रभागात महिला उमेदवार जनसेवाच्या भाग्यश्री सापते यांची लढत जनसेवा विकासच्या मनिषा जेजुरकर यांच्याबरोबर होत आहे.

प्रभाग 2 मध्ये जनसेवा मंडळ व अस्तगाव युवा ग्रामविकास मंडळात लढाई होत आहे. जनसेवा विकास मंडळाने या प्रभागात आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. जनेसवाचे नानासाहेब अष्टेकर यांची लढत अमोल घोडेकर या अस्तगाव युवा ग्रामविकास मंडळाच्या उमेदवाराबरोबर तसेच अपक्ष सतीश आत्रे यांचेबरोबर होत आहे. जनसेवाचे नवनाथ नळे यांची लढत अस्तगाव युवा ग्रामविकासचे बबन नळे यांचेबरोबर होत आहे. महिला गटात फराना तांबोळी या जनसेवाच्या उमेदवार असून त्यांची लढाई अस्तगाव युवाच्या वैशाली नळे यांच्या बरोबर होत आहे.

प्रभाग 4 मध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संतोष गोर्डे हे जनसेवा विकास मंडळाचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात जनसेवाचे विपूल गवांदे उभे आहेत. या प्रभागात अनिल पठारे हे अपक्ष आहेत तर दत्तात्रय गोर्डे हेही उभे आहेत. अनु. जाती गटात जनसेवाच्या माया संजय त्रिभुवन यांची लढाई जनसेवा विकास मंडळाच्या ललिता त्रिभुवन यांच्याबरोबर होत आहे.

प्रभाग 5 मध्ये माजी सरपंच व उद्योजक केशव चोळके हे जनसेवाकडून उभे आहेत. त्यांच्या विरोधात जनसेवा विकासचे सुनिल चोळके हे उभे आहेत. अनु. जमातीमधुन राधा ज्ञानदेव मोरे या जनसेवाच्या उमेदवार असून त्यांच्या विरोधात जनसेवा विकासच्या शांता मोरे या उभ्या आहेत. महिला गटात जनसेवाकडून मंगल संजय चोळके तर जनसेवा विकासच्या दिपश्री राहुल चोळके या दोघीत लढाई होत आहे.

प्रभाग 6 मध्ये जनसेवाचे नवनाथ गोल्हार यांचा जनसेवा विकासचे रामकृष्ण त्रिंबक तरकसे यांच्याशी तसेच अपक्ष उमेदवार वसंत लोंढे यांच्या बरोबर लढत होईल. ओबीसी महिला गटात जनसेवाच्या मनिषा मोरे यांची जनसेवा विकासच्या श्रध्दा घोडेकर यांच्याबरोबर लढत होईल. जनरल महिला गटात अस्तगाव युवाची जनसेवा विकास बरोबर युती आहे. त्यांच्या मंदा लोंढे यांच्या विरोधात जनसेवाच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सविता संजय चोळके व जनसेवाच्याच मथुरा शंकरराव पठारे या दोघी उभ्या आहेत. या दोघींनीही आम्ही जनसेवाच्याच असा दावा केला आहे.

या निवडणूकीत कुणाचे पारडे जड आहे हे आताच सांगणे कठीण आहे. आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष आहे. प्रभाग 3 मध्ये दोन्ही जागा बिनविरोध झाल्याने तेथील मतदारांमध्ये नाराजी आहे. प्रचारात भाषण बाजी पेक्षा पायी प्रचारावर उमेदवारांचा भर आहे. निवडणुकीतील सर्व उमेदवार विखे यांना मानणारे आहेत. त्यामुळे कोणताही गट सत्तेत आला तरी ग्रामपंचायतीवर सत्ता विखे गटाचीच राहिल! मागील सत्तेतील जुना भाजपाच गट विखुरला गेला आहे. काही जनसेवा बरोबर, काही युवा ग्रामविकास बरोबर तर काही जनसेवा विकास मंडळाबरोबर सामिल झाले आहेत. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीनराव कापसे यांनी या निवडणुकीत पॅनल उभा न करता विखे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांचे समर्थक नंदकुमार जेजुरकर जनसेवा विकास मंडळाबरोबर सक्रिय झाले आहेत.

जनसेवा मंडळाचे नेतृत्व नंदकुमार गव्हाणे, ज्ञानदेव चोळके, गणेशचे संचालक जे. आर. चोळके, रामनाथ चोळके, अशोकराव नळे आदी करत आहेत तर जनसेवा विकास मंडळाचे नेतृत्व गणेशचे संचालक विजय गोर्डे, आर. बी. चोळके, नंदकुमार जेजुरकर हे करत आहेत. अस्तगाव युवा ग्रामविकास मंडळाचे नेतृत्व हेमंत गोर्डे, अॅड. पंकज लोंढे, दादासाहेब गवांदे, सागर लोंढे, शरद चोळके आदी करत आहेत.