आजपासून ग्रामपंचायती बंद !

विविध मागण्यांसाठी सरपंच, कर्मचारी आक्रमक
आजपासून ग्रामपंचायती बंद !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकार पातळीवर असणार्‍या वेगवेगळ्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने नगर जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज 18 ते 20 डिसेंबर या कालावधीत तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सरपंच व ग्रामसेवक संघटनेने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती ग्रामसेवक युनियनच्यावतीने देण्यात आली. या निर्णयामुळे आजपासून ग्रामपंचायतीचे काम बंद पडणार आहे.

गाव पातळीवर नियमित कामकाज करतांना अतिरिक्त कामाचा प्रचंड ताण प्रामुख्याने ग्रामसेवकांवर आहे. तो ताण कमी व्हावा, ज्याज्या विभागाचे कामे आहेत, त्यात्या विभागांनी करावीत, मात्र, तसे न होता, जिल्हा प्रशासन ग्रामसेवकांना सर्व कामांची सक्ती करत आहेत. या सक्तीमुळे ग्रामसेवक तणावात असून त्यांना मानसिक त्रास होत आहे. या शिवाय ग्रामसेवकांच्या वेतन त्रुटी प्रश्नाकडे सातत्याने राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. एक गाव एक ग्रामसेवक पद निर्मिती होत नाही. विस्तार अधिकार्‍यांच्या जागांमध्ये वाढ होत नाही. यासह अनेक प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु त्यावर काहीच कार्यवाही नसल्याने नगरसह राज्यातील 22 हजार ग्रामसेवक 27 हजार 536 ग्रामपंचायतींचे कामकाज तीन दिवस बंद ठेवून असंतोष व्यक्त करणार आहेत.

ग्रामसेवक युनियनचे राज्याचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा ग्रामसेवक संघटनेची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत तीन दिवसीय बंदचा निर्णय घेण्यात आला. सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत गाव पातळीवरील कर्मचारी, पदाधिकार्‍यांच्या न्याय प्रश्नांची सोडवणूक व्हावी, याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीन दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय राज्यस्तरावरावर घेण्यात आला आहे. या बंद काळात ग्रामसेवक कोणत्याही प्रकारच्या बैठकीला हजर राहणार नाहीत. तसेच सरपंच संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, संगणक परिचालक संघटना, ग्राम रोजगारसेवक संघटना आणि ग्रामसेवक संघटना यांच्या या संयुक्त आंदोलनामुळे गाव कारभार ठप्प होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com