ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण; तीन सदस्य अपात्र

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण केल्याप्रकरणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जालिंदर आनंदा गरुड, अशोक तुकाराम जगताप व लंकाबाई किशोर भाबड या तीन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र केले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले आहेत.

याप्रकरणी माजी उपसरपंच भाऊसाहेब मोतीराम भाबड यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीचे तीन सदस्य हे ग्रामपंचायतीच्या गट क्रं.80 मध्ये अतिक्रमण करून राहत असल्याचे व त्यांचेकडे वैयक्तिक जमीन असताना त्यांनी हे कृत्य केले असल्याचे कोपरगाव गटविकास अधिकार्‍यांच्या समक्ष पाहणी अहवालात ते दोषी आढळून आले. ग्रामपंचायत सदस्य जालिंदर गारुड व अशोक जगताप यांच्याकडे वैयक्तिक मिळकत असताना त्यांनी ‘ती’ लपवून शासकीय योजनांचा लाभ घेतला असल्याचे उघड झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी ही अपात्रतेची कारवाई केली आहे.

ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (1) ज-3 व 16 मधील तरतुदी नुसार ग्रामपंचायत क्षेत्रातील सरकारी जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करणारा ग्रामपंचायत सदस्य हा त्याच्या सदस्य पदासाठी अपात्र ठरतो. ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबातील व्यक्तीने जरी अतिक्रमण केले किंवा कुटुंबियांनी अतिक्रमण केलेल्या जागेत राहत असेल असा कोणताही व्यक्ती ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी अपात्र असतो.

याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने जनाबाई विरुद्ध अतिरिक्त आयुक्त मधील निकालामध्ये अतिक्रमणाबाबत अतिक्रमण धारक स्वतः अतिक्रमण क्षेत्राचा उपभोग घेणारा, अतिक्रमण करणारा अशा व्यक्तीस सदस्य राहण्यास अपात्र ठरविण्यात आले असून तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करून राहणार्‍या पदाधिकार्‍यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अर्जदार भाऊसाहेब भाबड यांच्यावतीने अ‍ॅड. एम. यु. सय्यद यांनी युक्तिवाद केला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com