मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत अण्णा हजारे देणार प्रतिक्रिया

अण्णा हजारे
अण्णा हजारे

सुपा|वार्ताहर|Supa

अहमदनगर जिल्हासह राज्यात हजारो ग्रांमापचायत पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपत आल्याने आता या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्तीसाठी अनेकाना डोहाळे लागले आहेत; परंतु त्यासाठीच्या निकषासंबंधी उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले परिपत्रकाचा अभ्यास करून बोलेन.

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता प्रशासक येणार आहे. त्या प्रसासकाची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार होणार आहे. याचा अर्थ ग्रामपंचायतीवर नव्याने नियुक्त होणारा प्रशासक हा फक्त राजकीय वजनदार असावा लागेल. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्ती केली. याबाबत परीपत्रकाचा अभ्यास करून बोलतो असे हजारे यांनी सांगितले.

त्यामुळे आता हजारे नेमके काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. करोनामुळे निवडणुका घेता येत नसल्याने अता राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार आहे. राज्यात सुमारे 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या मुदती या वर्षाअखेरीस म्हणजे डिसेंबर अखेर संपत आहेत. या सर्वच ग्रामपंचायतींवर प्रशासकाच्या नियुक्त्या होणार आहेत. मात्र ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल त्यावेळी तेथे प्रशासक येणार आहे. तेथे निवडणूक होताच त्या प्रशासकाची मुदत तात्काळ संपणार आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी पालकमंत्र्यांची शिफारस लागणार आहे. याचा अर्थ पालकमंत्री किंवा त्या तालुक्यातील आमदार सुचवतील त्यांची वर्णी प्रशासक म्हणून लागणार आहे. आमदारांचे वर्चस्व असलेल्या कार्यकर्त्यांची वर्णी सरपंचपदी लागणार आहे.

मात्र त्यासाठी काही शैक्षणिक पात्रता किंवा संबंधित व्यक्तीचा ग्रामपंचायतीचा कारभार पहाण्याची कुवत किंवा अनुभव विचारात घेतला जाईल याची मात्र खात्री नाही. त्यामुळे यापुढील काळात प्रशासक नियुक्तीनंतर गावागावत वादही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सरपंचपदी आपलीच वर्णी लागावी यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

या प्रशासकाची निवड पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार होणार असली तरीही नियुक्ती मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. याबाबत हजारे यांना विचारले असता त्यांनी यावर मी अभ्यास करून बोलतो, असे सांगितल्याने आता हजारे काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र राजकीय नेते, युवा कार्यकर्ते, महिला आघाडीच्या नेत्या, आजी माजी पदाधिकारी या सर्वांना संरपच पदाच्या खुर्चीवर बसण्याचे डोहाळे लागले आहेत एवढे मात्र निश्चित !

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com