अपुरी गणसंख्या व तहसीलदारांच्या गैरहजेरीमुळे पुणतांब्याची ग्रामसभा स्थगित

अपुरी गणसंख्या व तहसीलदारांच्या गैरहजेरीमुळे पुणतांब्याची ग्रामसभा स्थगित

वाळू लिलावावरून ग्रामस्थांत हमरीतुमरी; गावठी कट्टे बाळगणार्‍यांची संख्या वाढली

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

गोदावरी नदीपात्रातील पुणताबा-रास्तापूर हद्दीतील वाळूचा लिलाव करण्यासंबंधीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पुणतांबा ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत पुरेशी गणसंख्या नसल्यामुळे तसेच तहसीलदार कुंदन हिरे हे उपस्थित नसल्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी सर्वानुमते ही ग्रामसभा स्थगित ठेवण्याचा तसेच पुढील ग्रामसभा प्रांतधिकारी किंवा तहसीलदार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्याचा ठराव मंजूर केला.

काल 11 वाजता ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच डॉ. धनजंय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदारांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार बी. जी. भांगरे, मंडल अधिकारी जयश्री आदिक, कामगार तलाठी सोमनाथ शिंदे, ग्रामसेवक आजीनाथ कडलग, शिवसेना नेते सुहास वहाडणे, सुभाष वहाडणे, श्याम माळी, प्रताप वहाडणे, कामगार नेते सुभाष कुलकर्णी, बाळासाहेब चव्हाण, मनोज गुजराथी, नामदेव धनवटे, भास्कर मोटकर, संदीप धनवटे, छगन जोगदंड, हेड कॉ. श्री. मंडलिक, किसन बोरबने, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामसभा सुरु झाल्यानंतर कामगार तलाठी सोमनाथ शिंदे यांनी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला. सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनीही गोदावरी नदीपात्रातील वाळूचा लिलाव करावयाचा की नाही याबाबत सर्वानुमते ग्रामस्थांनी चर्चा करून निर्णय घ्यावयाचा आहे हे स्पष्ट केले. ही चर्चा चालू असताना शिवसेनेचे सुहास वहाडणे यांनी याच विषयावर 24 ऑगष्ट रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेला तहसीलदार किंवा प्रातधिकारी यांच्या उपस्थितीशिवाय ग्रामसभा घेऊ नये असा त्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ठराव संमत केला होता. आज तहसीलदार किंवा प्रांतधिकारी उपस्थित नाहीत. त्यामुळे मागच्या ठरावाला काडीमात्र किंमत राहणार नाही. त्यामुळे आजची ग्रामसभा स्थगित करावी, अशी भूमिका मांडली. त्याला नामदेव धनवटे तसेच भास्कर मोटकर यांनी दुजोरा दिला.

यावेळी सुभाष वहाडणे व बाळासाहेब चव्हाण यांनीही वाळूच्या लिलावाबाबत आपली भूमिका मांडली. वाळूच्या लिलावाबाबत आयोजित केलेली ग्रामसभा दुसर्‍यांदा स्थगित केली जात आहे. तसेच 20 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पुणतांबा गावात ग्रामसभेला ग्रामस्थ उपस्थित का राहत नाही याचा शोध घेण्याची गरज स्पष्ट केली. सध्या वाळूचा बेकायदा उपसा सर्रास सुरू आहे. हे ग्रामसभेला निर्दशनास आणून दिले व या प्रश्रावर कायमचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. एकतर संपूर्ण वाळूचा लिलाव करून टाकावा किंवा वाळूचा कणही उचलला जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे याचा आर्वजून उल्लेख केला.

बेकायदा वाळूच्या उपशामुळे गावात गावठी कट्टेवाल्यांचा सुळसुळाट वाढला असून गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गुंडगिरीही वाढली असून त्याचाही ठोस बंदोबस्त झाला पाहिजे, असे स्पष्ट केले. डॉ. धनवटे यांनी वाळूच्या लिलावाबाबत निर्णय घ्यावयाचा आहे त्यावर चर्चा करावयाची आहे, असे लक्षात आणून दिले. यावर यावेळी सुभाष वहाडणे व डॉ. धनवटे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. प्रताप वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, भास्कर मोटकर यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे आणखी वादळी चर्चा सुरू होऊन विषयांतर होऊ लागताच छगन जोगदंड यांनी थेट नायब तहसीलदार यांनाच प्रश्न विचारून ग्रामसभेबाबत विचारणा केली. यावेळी श्री. भांगरे यांनी पुरेशी गणसंख्या नसल्यामुळे तसेच ग्रामस्थांनी मागणी केल्यामुळे तहसीलदार उपस्थित नाहीत त्यामुळे ग्रामसभा स्थागित करत आहोत, असे जाहीर केल्यामुळे अखेर ग्रामसभेचे कामकाज थांबविण्यात आल्याचे जाहीर केले.

अधिकारी गेल्यानंतरही काही मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेण्यात आली. मात्र त्यातही वाळूचा लिलाव करावयाचा की नाही याबाबत एकमत झाले नाही व काथ्याकूट करूनही उपयोग झाला नाही. अखेर ग्रामसभेला जास्तीत जास्त ग्रामस्थ उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत याबाबत सहमती झाली. मात्र ग्रामसभा स्थगित करण्यामागे कोणाचा काही हेतू आहे का याबाबत काही ग्रामस्थांनी सवाल उपस्थित केला. त्यामुळे पुढची ग्रामसभा केव्हा आयोजित केली जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com