दीड एकरात घेतले 21 क्विंटल हरभर्‍याचे उत्पादन

पोहेगावच्या कृष्णा औताडेंनी ठेवला शेतकर्‍यांपुढे आदर्श
दीड एकरात घेतले 21 क्विंटल हरभर्‍याचे उत्पादन

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

निसर्गाचा वाढलेला असमतोल व वाढलेल्या इंधनाच्या दरामुळे शेती मशागतीच्या दराबरोबरच मजुरांची व महिलांची देखील मजुरीचे वाढत असलेले भाव यामुळे ग्रामीण भागात शेती व्यवसाय करणे अवघड झाल्याचे एकूण काहीशे चित्र आहे. असे असताना शेतकरी कृष्णा औताडे यांनी दीड एकर शेतामध्ये 21 क्विंटल हरभर्‍याचे विक्रमी उत्पादन घेऊन एक नवीन आदर्श शेतकर्‍यांसमोर निर्माण केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील शेतकरी कृष्णा औताडे यांनी दीड एकर शेतामध्ये जॉकी 9218 या वाणाची निवड करून टोकन यंत्राच्या साह्याने लागवड केली. ठिबक सिंचनद्वारे पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले. दोन बेडमध्ये साडेचार फुट अंतर ठेवून नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात लागवड केली. 90 दिवसांमध्ये हे पीक काढणीला आल्याचे कृष्णा औताडे यांनी सांगितले.

दरम्यानच्या काळात ठिबकच्या साह्याने गरजेनुसार तीन पाणी दिले. ठिबकच्या साह्याने विद्राव्य खतांचे व्यवस्थापन करण्यात आले अशा पद्धतीने 90 दिवसांमध्ये दीड एकर क्षेत्रामध्ये 21 क्विंटल हरभर्‍याचे उत्पादन मिळाले. म्हणजे एका एकरात 14 क्विंटलचे उत्पादन मिळाले. खरीपातील सोयाबीन काढून नांगरट व रोटावेटर करून साडेचार फुटी रुंदीचे बेड तयार करून त्यावर लागवड केली.

4 हजार 500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे या हरभर्‍यास दर मिळाला असल्याचे या शेतकर्‍याने सांगितले. रब्बी हंगामात इतर पिकांचा तुलनेत हे उत्पन्न चांगले व खर्चाच्या तुलनेत देखील किफायतशीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. निंदनी, रासायनिक विद्राव्य खते व कीटकनाशक फवारणी या सगळ्या गोष्टीसाठी 12 हजार रुपये खर्च आला. सध्या शेती करण्यासाठी मजुरांची मोठी समस्या निर्माण झालेली आहे.

मशागतीसाठी ट्रॅक्टर मजुरीचे भाव देखील गगनाला भिडलेले असल्यामुळे शेती करणे तोट्याचे झाले असताना या शेतकर्‍याने त्यातून एक चांगला मार्ग शोधला. या पिकाला मजूर जास्त लागत नाही आणि त्या मानाने उत्पन्न चांगले मिळते. म्हणून शेतकर्‍यांनी अति खर्चाची पिके न घेता अशी जास्त नफा देणारी पिके घ्यावी. रब्बी हंगामामधील इतर पिकांच्या तुलनेत हे हरभर्‍याचे पिक निश्चितच फायदेशीर असल्याचे कृष्णा औताडे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com