ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे २१ ऑक्टोबरपासून कामबंद व धरणे आंदोलन

ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे २१ ऑक्टोबरपासून कामबंद व धरणे आंदोलन

अकोले (प्रतिनिधी)

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांबाबत शासन कोणताच निर्णय घेत नाही याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, शाखा अकोले २१ ऑक्टोबर पासून पंचायत समिती, अकोले समोर बेमुदत कामबंद व धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा युनियनचे तालुकाध्यक्ष संदीप घोडके यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ढोकणे व सचिव दिलीपराव डिके यांच्या मार्गदर्शनानुसार शाखा अकोलेच्या वतीने तालुकाध्यक्ष संदीप घोडके, कार्याध्यक्ष संदीप वैद्य, सचिव संतोष नाईकवाडी, उपाध्यक्ष दौलत नवले, सह-सचिव साईनाथ झोळेकर यांनी शुक्रवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनकुसळे यांना निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रती आमदार डॉ. किरण लहामटे, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.), तहसीलदार, पोलीस निरीक्षक व पंचायत समितीचे सभापती यांनाही दिल्या आहेत.

आमच्या प्रलंबीत मागण्यांबाबत २७-९-२०२१ रोजी निवेदन दिले होते. परंतु त्याबाबत कुठलेच आदेश पारीत झाल्याचे दिसून येत नाही. अतिशय कमी किमान वेतनात ग्रामपंचायत कर्मचारी आपली जबाबदारी पार पारत असताना त्याचा मोबदला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळत नाही ही खेदाची बाब आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) जिल्हा परिषद यांच्या पत्रान्वये वाढीव किमान वेतन मिळावे, किमान वेतनातील फरक मिळावा, थकीत तसेच चालू राहणीमान भत्ता मिळावा, भविष्य निर्वाह निधी रक्कमेत ग्रामपंचायत हिस्सा जमा करावा, सेवा पुस्तक अद्ययावत करावे, सानुग्रह अनुदान व ड्रेस कोड दीपावली पूर्वी मिळावेत, सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा उतरविणे, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक यांच्यासमवेत बैठक आयोजीत करणे या व अन्य मागण्याचा येत्या ८ दिवसांत योग्य तो निर्णय न घेतल्यास गुरूवार दि. २१ ऑक्टोबर २०२१ पासून सकाळी ११ वा. पंचायत समिती, अकोले समोर बेमुदत काम बंद व धरणे आदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.