टाकळीमिया (वार्ताहर) -

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावच्या सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाने

डोके वर काढले आहे. गल्लीबोळात, हमरस्त्यावर अतिक्रमणधारक पुढे येत असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असून वाहतूक कोंडी होत आहे. ग्रामपंचायतीने नकाशाप्रमाणे मोजणी करून अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

गावातील महादेव मंदिर ते करपे गल्ली रस्ता, महादेव मंदिर ते तोडमल यांच्या घरापर्यंतचा मुख्य रस्ता, मुख्यचौक ते राहुरी रस्ता, मुख्यचौक ते लाख रस्ता, मुख्यचौक ते चौधरी यांच्या घरापर्यंतचा रस्ता, गायकवाड दुकान ते सोसायटी पर्यंतचा रस्ता, खंडोबा मंदिर ते कारखाना रोड पाचचारी पर्यंत, खंडोबा मंदिर ते देवळाली प्रवरा नागओढ्यापर्यंत आदी मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत व नव्याने होत आहेत. दुकानासमोर ओटे तसेच पत्र्याचे शेड उभारून पुढे वाढविण्यात येत आहेत. कोणी फरशा टाकतात तर कोणी नव्या टपरी टाकतात. काही रस्त्यावर तर जनावरांचे शेड ठोकतात.

तर अनेकजण उकिरडे टाकून रस्ता अरुंद करतात. याबाबत अनेकवेळा नागरिक ग्रामपंचायतीकडे तक्रार करतात. मात्र, ग्रामपंचायत सदस्य व गावचे नेतेमंडळी एकमेकांकडे बोट दाखवून आपण नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतात. काहीजण स्वतंत्रपणे ग्रामपंचायत सदस्य किंवा नेते मंडळींची भेट घेऊन त्यांना टपरीसाठी जागा मागतात. तर नेते किंवा सदस्यही वेळ मारून नेण्यासाठी बरं ठेव तिथे टपरी, आपण नंतर बघू असे सांगतात. यावर कुणी तक्रार केली तर त्याने कशी टपरी टाकली? त्याचे कुणी काय केले? कुणाला काय करायचे ते करा आम्ही टपरी काढणार नाही. तर ग्रामपंचायतीचे गाळे कुणी घेतले व आता ते कसे विकले? याचा पाढा वाचला जातो.

गावातून सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी), पंतप्रधान सडक योजना व जिल्हा परिषद अंतर्गत हे रस्ते जात असले तरी या रस्त्यावर गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या खात्यांशी संपर्क करून त्यांची मदत घेऊन व गावच्या अंतर्गत रस्त्यांचे अतिक्रमण ग्रामपंचायतीने अतिक्रमण विरोधी खात्यामार्फत काढली पाहिजेत. ग्रामपंचायतीने सर्व रस्त्यांची मोजणी करून रस्त्याची हद्द ठरवून अतिक्रमण काढावे व स्वतःहून अतिक्रमण काढले नाहीतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तरी ग्रामपंचायतीने या मागणीचा विचार करून अतिक्रमित रस्त्यांचा श्वास मोकळा करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.