अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतीमधील 7 हजार 134 सदस्य पदाच्या जागांसाठी 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या

शेवटच्या दिवसापर्यंत 23 हजार 803 अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जाची 31 डिसेंबरला रात्री उशीरापर्यंत छाननी होऊन त्यात 619 अर्ज अवैध ठरले आहेत. तर 23 हजार 184 वैध ठरले आहेत. ऐवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता माघारीसाठी गावागावातील नेत्यांनी कंबर कसली असून इच्छुकांच्या माघारीसाठी मित्र, नातेवाईक तसेच अन्य मार्गाने दबाव आणला जात आहे. कोण किती यशस्वी झाले हे सोमवारी माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.

15 जानेवारीला होणार्या या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 4 जानेवारीपर्यंत माघारीसाठी मुदत आहे. यंदा विक्रमी अर्ज दाखल झाल्याने कमी कालावधीत मोठ्या संख्याने अर्ज काढण्यासाठी नेत्यांना वेळ पुरणार का हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. त्यातही आज शनिवारी आणि उद्या रविवारी कार्यालयीन सुट्टी असल्याने सोमवारी माघारीसाठी एकच दिवस उपलब्ध होणार आहे. यामुळे एका दिवसात किती इच्छुकांची समजूत घालून त्यांना उमेदवारी अर्ज माघारीसाठी तयार करणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूका या साधारणपणे दुरंगी होत असतात. मात्र, यंदा इच्छुकांची संख्या वाढल्याने स्थानिक पातळीवर दुरंगीसह अपक्ष उमदेवार मोठ्या संख्याने निवडणूक रिंगणात राहण्याची शक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा फॉम्यूला गाव पातळीवर टिकाणार का याकडे मतदारांचे लक्ष राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावागावातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काही दिवसांत त्यात चांगली वाढणार आहे. बिनविरोधाचे आव्हान केलेल्या पारनेर तालुक्यातून 2 हजार 285 उमदेवारांचे अर्ज वैध ठरले असून याच तालुक्यातून सर्वाधिक 120 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत. सर्वात कमी अवैध अर्ज हे कोपरगाव तालुक्यातून अवघे 11 ठरले आहेत.

सोमवारी चित्र स्पष्ट होणार

उमदेवारी अर्ज माघारीसाठी सोमवार (दि.4) रोजी अखेरचा दिवस आहे. या दिवशी माघारीनंतर निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवार हा महत्वाचा दिवस ठरणार असून किती इच्छूक माघार घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

छानणीनंतर वैध आणि कंसात अवैध अर्ज

अकोले 1 हजार 132 (21), संगमनेर 2 हजार 581 (90), कोपरगाव 964 (11), श्रीरामपूर 1 हजार 88 (22), राहाता 1 हजार 46 (28), राहुरी 1 हजार 372 (28), नेवासा 2 हजार 16 (56), नगर 1 हजार 885 (46), पारनेर 2 हजार 285 (120), पाथर्डी 2 हजार 309 (41), शेवगाव 1 हजार 295 (37), कर्जत 1 हजार 725 (29), जामखेड 1 हजार 258 (44), श्रीगोंदा 2 हजार 120 (46).