चंद्रकांत लांडगे

टाकळीभान (वार्ताहर) -

श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणावर दबदबा ठेवणार्या टाकळीभान ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू आहे. इच्छुक तरुणांचे गावचे

नेतृत्व करण्याचे प्रयत्न असल्याने दोन गट आमने सामने ठाकल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. गेली दहा वर्षे एकाच गटाकडे असलेली ग्रामपंचायतीची सत्ता तोलामोलाचे उमेदवार देऊन काबीज करण्यासाठी विरोधकांनी अटापिटा सुरू केल्याने राजकीय वातावरण कडाक्याच्या थंडीतही चांगलेच तापले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत रंग भरणार असल्याचे गेल्या वर्षभरापासून संकेत मिळत होते. ग्रामपंचायतीच्या सत्ताधार्यांच्या विरोधात गेल्या अडीच तीन वर्षांपासून विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत मदत करणार्या मुरकुटे गटाला दिलेला शब्द पाळला नसल्याने मुरकुटे गटात खदखद व्यक्त होत होती. सहमती करताना सत्तेत अडीच अडीच वर्षे वाटा देण्याच्या दिलेल्या शब्दाला सत्ताधारी पवार गटाने कात्रजचा घाट दाखवत गेली पाच वर्षे ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवले. त्यामुळे दुखावलेला मुरकुटे गट सत्ताधारी गटाबरोबर निवडणुकीत संघर्ष करणार हे निश्चित झाले होते. आगामी होणार्या निवडणुकीत मुरकुटे गटाने आ. कानडे व ससाणे गटाशी समझोता करीत सत्ताधारी पवार गटाविरोधात दंड थोपटले आहेत.

यंदा होणार्या निवडणुकीत पवार गटाने आखलेल्या रणनितीला विरोधक छेद देताना दिसत आहेत. पवारांच्या उमेदवाराच्या विरोधात तोलामोलाचा उमेदवार देऊन आव्हान उभे करण्यात विरोधक यशस्वी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे सहाही प्रभागांत निवडणुकीचा आखाडा चांगलाच गाजणार आहे. प्रभाग 1 हा माजी सभापती नानासाहेब पवार यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र या प्रभागात अनु. जाती साठी आरक्षण पडलेले नसल्याने मतदार संख्येने जास्त असलेल्या अनु. जातीच्या महिलेला सर्वसाधारण महिला गटातून लढावे लागत आहे. मागासांचा प्रवर्ग महिलेसाठी या प्रभागात एक जागा असल्याने व मागास प्रवर्गाची लोकसंख्या जास्त असल्याने नणंद भावजईची झुंज या प्रभागात प्रेक्षणीय ठरणार आहे तर सर्वसाधारण पुरुष मतदार संघात पवार यांचा पुतण्या रिंगणात आहे. अनु. जाती व मागासांचा प्रवर्ग मतदारांवर या प्रभागाचा विजय ठरणार आहे. प्रभाग दोनचे गेल्या चार पंचवार्षिक प्रतिनिधीत्व करणारे राजेंद्र कोकणे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत. या प्रभागात सर्वच उमेदवार नवखे आहेत. त्यामुळे या प्रभागाला नव्याने जोडलेल्या प्रभाग 3 चे मतदार कोणाला स्विकारणार यावर येथील लढत रंगणार आहे. प्रभाग 3 हा माजी सदस्य कान्हा खंडागळे यांच्या सोबत गेली 10 वर्षे राहिलेला आहे. माजी सरपंच मंजाबापू थोरात यांनीही काही काळ या प्रभागाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. यंदा या प्रभागात दोनच जागा असल्याने व थोरात खंडागळे सोबत असल्याने आज तरी या प्रभागात त्यांचे पारडे जड वाटते. प्रभाग 4 मध्ये मगर - मगर व पटारे-पटारे असा संघर्ष प्रथमच रंगणार आहे. प्रभाग 5 हा माजी सरपंच रुपाली धुमाळ व चित्रसेन रणनवरे यांचा हक्काचा प्रभाग आहे. मात्र या निवडणुकीत धुमाळ व रणनवरे या दोन्ही कुटुंबांनी माघार घेतली आहे. कान्होबा खंडागळे यांनी आपल्या भावजईला या प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरवून मोठे आव्हान या पारंपारीक गटात उभे केले आहे. प्रभाग 6 हा दिवंगत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब दाभाडे यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. नेहमीच विरोधकांना नामोहरम करीत त्यांनी गड शाबुत ठेवलेला आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी दाभाडे यांचे निधन झाल्याने त्यांचेच बाजार समितीचे सहकारी नानासाहेब पवार यांनी आपल्या मुलाला या प्रभागातून उमेदवारी देऊन दाभाडे यांच्या अभेद्य किल्याला हादरे देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेले 10 वर्षे प्रतिनिधीत्व करणारे भारत भवार यांनी निवडणुकीतून माघार घेत अशोकचे संचालक दत्तात्रय नाईक यांना पुढे केल्याने निवडणुकीची रंगत वाढली असली तरी स्व. दाभाडे यांचा गड शाबुत रहाणार का? हे पहावे लागेल. या प्रभागातील अपक्ष सोमनाथ पाबळे व मुकुंद हापसे यांची भूमिका आजच्या माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.

आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी दोन्ही गटांकडून त्या त्या प्रभागातील उमेदवार जवळ जवळ निश्चित झालेले आहेत. माघारी पुर्वीच उमेदवार वैयक्तिक गाठीभेटी घेऊन प्रचारालाही जुंपले आहेत. लोकसंख्येने जास्त आसलेले व प्रभाग 2 व 5 मध्ये नेहमीच वर्चस्व ठेवणारे कोकणे आडनावाचा एकही उमेदवार यंदाच्या निवडणूक रिंगणात नाही हे या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. गेल्या दहा वर्षांची असलेली सत्ता बदलासाठी लोकसेवा महाविकास आघाडीने मात्र अटापिटा सुरू केला आहे.