अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायत निवडणुकीत 7 हजार 134 सदस्यपदासाठी बुधवारी रात्रीपर्यंत विक्रमी 23 हजार 537 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

दाखल या अर्जाची गुरूवारी दिवसभर 14 तालुक्यात छाननी करण्यात आली. दाखल उमेदवारी अर्जामध्ये गत पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक खर्च सादर न केलेल्या आणि पाच वर्षासाठी निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आलेल्यांचे अर्ज आहे का याचा शोधण्यास उशीर होत असल्याने बहुतांशी तालुक्यातील छानणीची प्रक्रिया गुरूवारी रात्री उशीरपर्यंत सुरू होती.

दरम्यान, रात्री दहापर्यंत झालेल्या प्रक्रियेत दाखल अर्जापैकी 8 तालुक्यातील 256 अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहे. 30 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत 14 तालुक्यातून 23 हजार 537 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची गुरूवारी सकाळपासून छानणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गुरूवारी रात्री दहा वाजेपर्यंत 12 हजार 801 उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले होते. तर अकोले 15, कोपरगाव 11, राहुरी 28, नेवासा 56, नगर 37, शेवगाव 37, कर्जत 19 आणि जामखेड 44 असे 256 अर्ज अवैध ठरविण्यात आले.

दुसरीकडे गत पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी 2016 मध्ये पुढील पाच वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले होते. त्यांचा निवडणूक लढविण्यास आपत्रतेचा कालावधी हा आदेश झाल्यापासून पुढील पाच वर्षाचा आहे. दरम्यान आता दाखल उमेदवारी अर्जात 2016 मध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांचा अर्ज आहे का याची पडताळणी करण्यात येत असल्याने छानणीच्या प्रक्रियेला वेळ होत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. अद्यापही सहा तालुक्यातील छानणीची प्रक्रिया बाकी असून रात्री उशीरा अथवा आज सकाळी वैध आणि अवैध अर्जाची आकडेवारी प्राप्त होणार आहे.