
संगमनेर (प्रतिनिधी)
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळ व माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणूकीत विखे यांच्या जनसेवा मंडळाने थोरात गटाला चांगलेच धक्के दिले आहे.
थोरात यांचे होम पीच असलेल्या जोर्वेत विखे गटाचा सरपंच निवडूण आला आहे तर निमोण ग्रामपंचायतीवर देखील विखे गटाचा सरपंच निवडूण आला आहे. विखे यांना प्रत्युत्तरात थोरात गटाने निमगावजाळी व उंबरीबाळापूर ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. मात्र घुलेवाडी मध्ये ग्रामस्थांनी थोरात गटाला जोरदार धक्का देत माजी सरपंच सोपान राऊत यांच्या स्नुषा निर्मला राऊत यांना विजयी केले आहे.
आज सकाळी संगमनेर नगरपालिकेच्या क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अमोल निकम यांच्या नेतृत्वाखाली 37 ग्रामपंचायतींचे निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर झाले. 37 ग्रामपंचायतींपैकी थोरात गटाला 27 तर विखे गटाने 8 ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे. तर सोपान राऊत यांच्या स्वतंत्र गटाने घुलेवाडीचे सरपंच पद मिळवून सत्ताधार्यांना मोठा धक्का दिला आहे. त्याचबरोबर निळवंडे येथे अपक्ष उमेदवार शशिकला शिवाजी पवार या विजयी झाल्या आहेत.
जोर्वेमध्ये सरपंचपदी विखे गटाच्या प्रिती गोकुळ दिघे, निमोण सरपंचपदी संदीप भास्कर देशमुख, कनकापूरमध्ये ज्योती अंकुश पचपिंड, कोल्हेवाडीमध्ये सुवर्णा राहुल दिघे, सादतपूर नारायण निवृत्ती गुंजाळ, रहिमपूर सविता लक्ष्मण शिंदे, मालुंजे सुवर्णा संदीप घुगे, तळेगाव दिघे उषा रमेश दिघे या सरपंचपदी निवडूण आल्या आहेत.
निळवंडे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शशिकला शिवाजी पवार विजयी झाल्या आहेत. शशिकला शिवाजी पवार या कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांच्या सासूबाई आहेत. इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारी दाखल शशिकला पवार यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. शशिकला पवार यांनी सुशीला उत्तम पवार यांचा पराभव केला आहे.