
श्रीगोंदा | प्रतिनिधी
राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक नेत्यांनी आपले गड राखले आहे तर अनेकांच्या गडाला सुरूंग लागला आहे.
काष्टीत आमदार बबनराव पाचपुते गटाला धक्का देत त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंच पदाची निवडणुक जिंकली तर आमदार पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काष्टीत १७ पैकी पाचपुते गटाला १० जागा मिळाल्या, मात्र सरपंच पद हुकले. बेलवंडी मध्ये मात्र विखे समर्थक आण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव ऋषिकेश शेलार सरपंच पदावर विजयी होत गावात विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला इथे १८ जागा शेलार गटाने जिंकल्या.
काष्टीमध्ये आमदार पाचपुते यांच्या घरात उभी फूट पडली. इथे त्यांचेच पुतणे साजन पाचपुते यांना विरोधी नागवडे गटाने गळाला लावत त्याच्याच नेतृत्वाखाली पॅनल उभा केला होता. त्यात १७ पैकी १० जागा आमदार पाचपुते गटाला मिळाल्या तर विरोधी गटाला सात जागा मिळाल्या. सरपंच पद साजन पाचपुते यांना मिळाले. घोगरगावमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबासाहेब भोस गटाचे सरपंच विजयी झाले.