Gram Panchayat Election : राहाता तालुक्यात 11 ग्रामपंचायतीसाठी 81.03 टक्के मतदान

Gram Panchayat Election : राहाता तालुक्यात 11 ग्रामपंचायतीसाठी 81.03 टक्के मतदान

राहाता | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी सरासरी 81.03 टक्के मतदान झाले आहे.

राहाता तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या 49 वॉर्डांमधून 132 जागांसाठी मतदान घेण्यात आले. सरपंच पदासाठी थेट मतदान असल्याने तालुक्यातील सर्वच उमेद्वारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. काल सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली. 11 ग्रामपंचायतींसाठी 16020 पुरुष मतदार तर स्त्री मतदार 15045 असे एकूण 31065 इतके मतदार 11 ग्रामपंचायतींसाठी होते. 25,173 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तालुक्यातील साकुरी, नपावाडी, खडकेवाके येथे अनुचित प्रकार घडू नये म्हणून अधिक पोलीस यंत्रणा मतदान शांततेत पार पडावे यासाठी तैनात करण्यात आली होती. साकुरीत एक पोलीस उपनिरीक्षकासह 15 पोलीस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान तैनात होते. साकुरीतीलच गोदावरी वसाहत येथील मतदान केंद्रांवर पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे दिवसभर तळ ठोकून होते. तेथेही मतदान केंद्रांवर प्रत्येक एक आणि 100 मिटर अंतरावर काही पोलीस तैनात होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. साकुरीत किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर काल सकाळी काही वेळ रांगा दिसून आल्या. त्यानंतर मात्र रांगा न दिसता मतदान धिम्यागतीने कमी अधिक प्रमाणात दिवसभर सुरू होते.

झालेले मतदान असे- नांदुर्खी बु.-89.90 टक्के, नांदुर्खी खुर्द 93.45 टक्के, राजुरी 77.59 टक्के, डोर्‍हाळे 91.61 टक्के, साकुरी 76.41 टक्के, खडकेवाके 89.10 टक्के, रांजणखोल 75.26 टक्के, आडगाव खुर्द 87.89 टक्के, सावळीविहीर बु. 74.29 टक्के, नपावाडी 91.63 टक्के, निघोज 83.90 टक्के असे मतदान झाले. या निवडणुकीत 93.71 टक्के पुरुषांनी तर 78.60 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. या सर्व ग्रामपंचायतीचे सरासरी 81.03 टक्के मतदान झाले. मतदान सर्वत्र शांततेत पार पडले.

झालेल्या मतांची मोजणी उद्या मंगळवार दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता राहाता तहसील कार्यालयात होणार आहे. एकूण सात फेर्‍या होणार आहेत. त्यामुळे दीड ते दोन तासांत या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. सात टेबल यासाठी प्रत्येक फेरीसाठी ठेवण्यात आले आहेत. पहिल्या फेरीत नांदुर्खी व डोर्‍हाळे या दोन ग्रामपंचायतींची मतमोजणी होईल.

दुसर्‍या फेरीत राजुरी व नपावाडी यांची मतमोजणी होईल. तिसर्‍या फेरीत निघोज आणि आडगाव खुर्द यांची मतमोजणी होईल. चौथ्या फेरीत नांदुर्खी खुर्द व खडकेवाके यांची मतमोजणी होईल. पाचव्या फेरीत केवळ रांजणखोल ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल. सहाव्या फेरीत सावळीविहीर ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल तर सर्वात शेवटी सातव्या फेरीत साकुरी ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल, अशी माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

या निवडणुकीसाठी मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार किंवा मतमोजणी प्रतिनिधी यापैकी 1 अशी उपस्थित राहण्यास परवानगी मिळणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्याकडून ओळखपत्र घेऊन जावे, असे आवाहन श्री. हिरे यांनी केले आहे.

नववधूने बजावला मतदानाचा हक्क !

राहाता तालुक्यातील साकुरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चक्क लग्नाच्या दिवशी नव वधुने मतदानाचा हक्क बजावला. साकुरी गावचे पोलीस पाटील बाबासाहेब बनसोडे यांची कन्या प्राजक्ता बाबासाहेब बनसोडे हिने विवाह सोहळ्या अगोदर आपला मतदानाचा हक्क बजावत जनतेसमोर नवा आदर्श ठेवला आहे. आपले मतदान किती महत्त्वपूर्ण आहे. याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. लग्नाच्या लगबगीत व व्यस्त असताना वेळेत वेळ काढत आपले बहुमोल मतदान आज प्राजक्ताने केले. आधी मतदान नंतर लग्न! याची प्रचिती प्राजक्ताच्या मतदानाने आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com