शेवटच्या दिवशी 13 हजार 480 अर्ज

अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या काल बुधवारी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जाचा पाऊसच

पडला. एकाच दिवसात 13 तालुक्यातून 13 हजार 480 उमदेवारी अर्ज दाखल झाले असून यामुळे 767 ग्रामपंचायतीमधील 7 हजार 134 सदस्य पदासाठी विक्रमी 21 हजार 515 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल या अर्जाची आज (गुरूवारी) छाननी होणार आहे. त्यानंतर 4 जानेवारीपर्यंत माघारीसाठी मुदत आहे. दरम्यान, संगमनेर तालुक्यातील दाखल अर्जाची आकडेवारी रात्री उशीरापर्यंत जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाली नव्हती. या प्रक्रियेदरम्यान प्रचंड गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले.

जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. बुधवारी उमदेवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यात निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल करण्यास उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. शेवटच्या तीन दिवसांत गर्दी होण्याचा अंदाज आल्याने प्रत्येक तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यादृष्टीने उपाययोजना आणि पोलीस बंदोबस्त लावला होता. सोमवारी 1 हजार 445 उमेदवारी तर मंगळवारी एकदम 6 हजार 433 उमेदवारी अर्ज, तर बुधवारी अखरेच्या दिवशी 13 हजार 480 अर्ज दाखल झाले असून यामुळे एकूण दाखल अर्जाची संख्या 21 हजार 515 झाली आहे.

दाखल अर्जाची आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छानणी होणार असून त्या ठिकाणी अपूर्ण माहिती आणि चुकीची माहिती असणारे अर्ज बाद करण्यात येवून निवडणूक रिंगणात असणार्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 4 जानेवारीला माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, बुधवारी निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणि उमदेवारांना पारंपारिक पध्दतीने अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली असल्याने तसेच वेळ सायंकाळी साडेपाचपर्यंत वेळ वाढवून दिलेला असल्याने सर्व तालुक्यात निवडणूक कार्यालय आणि परिसारात तोबा गर्दी होती. उमदेवारांनी मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केल आहे. आता सर्वांचे लक्ष छानणी आणि माघारीकडे लागले असून त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

असे आहे चित्र

676 ग्रामपंचायती

2 हजार 629 प्रभाग संख्या

2 हजार 859 मतदान केंद्र संख्या

7 हजार 134 सदस्य संख्या

15 हजार 50 हजार 491 मतदार संख्या

8 लाख 13 हजार 31 पुरुष मतदार

7 लाख 37 हजार 451 महिला मतदार

9 अन्य मतदार

सदस्य संख्या आणि कंसात दाखल उमेदवारी अर्ज

अकोले 466 (1 हजार 153), संगमनेर 867 (मंगळवार अखेर 375), कोपरगाव 279 (996), श्रीरामपूर 279 (1 हजार 109), राहाता 301 (1 हजार 208), राहुरी 418 (1 हजार 407), नेवासा 591 (2 हजार 72), नगर 583 (1 हजार 929), पारनेर 776 (2 हजार 389), पाथर्डी 680 (2 हजार 328), शेवगाव 408 (1 हजार 332), कर्जत 504 (1 हजार 752), जामखेड 417 (1 हजार 302) आणि श्रीगोंदा 565 (2 हजार हजार 163) असे 7 हजार 134 जागांसाठी 21 हजार 515 अर्ज दाखल झाले आहेत.

आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष आणि हिवरेबाजार (ता. नगर) चे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी बुधवारी दुपारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक ही लोकशाहीचा पाया असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

क्षणचित्रे

* नगर तालुक्यात बिनविरोधचा प्रस्ताव गावात लटकला

* पाथर्डी तालुक्यातील तनखडी व सोमठाणे खुर्द या

दोन गावच्या निवडणुका बिनविरोध झाल्या

* शेवटच्या दिवशी उमदेवारी दाखल करण्यास तुफान गर्दी

कुठे काय...

बेलापुरात तब्बल 83, टाकळीभान 93, कारेगावात 64, पढेगाव 60 तर मातापूरमधून 42 अर्ज

अकोलेत आजी -माजी आमदारांचे समर्थक सरसावल्याने लढती रंगणार

वांबोरीत 112, उंबरेत 72, राहुरी खुर्द 73, गुहात 43 तर सात्रळमध्ये 65 जणांची उमेदवारी

माघारीसाठी गावपुढारी,पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढणार

आता माघारीकडे

सर्वांच्या नजरा

ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी गावागावांत अनेकदा बैठका झाल्या. नेत्यांनीही बिनविरोध कसरत केली. पण एकमत न झाल्याने अनेक गावांतील दोन्ही गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आता यातील कोण माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.