राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक निकाल जाहीर

राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक निकाल जाहीर

राहुरी | प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतमध्ये काल पोटनिवडणूक होऊन चार जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला.

यामध्ये म्हैसगांव येथील दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. राहुरी खुर्द येथे राष्ट्रवादी तसेच आरडगांव येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने दणदणीत विजय मिळवून झेंडा फडकावला.

राहुरी तालूक्यातील म्हैसगांव ग्रामपंचायत येथील दोन, राहुरी खुर्द ग्रामपंचायत येथील एक तर आरडगांव ग्रामपंचायत येथील एक अशा चार जागा रिक्त झाल्या होत्या. या चार जागांसाठी काल दिनांक २१ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते.

आज दिनांक २२ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. यात म्हैसगांव येथील वार्ड क्रमांक एक मध्ये भाजप प्रणित विकास मंडळाचे मोहनदास विनायक विधाटे व राष्ट्रवादी प्रणित जनसेवा मंडळाचे किरण अरूण विधाटे यांच्यात लढत झाली. याठिकाणी एकूण ८१८ मतदाना पैकी ४७४ मतदान झाले. तर नोटाला ९ झाले. त्यापैकी किरण विधाटे यांना २२५ मते पडली. तर मोहनदास विधाटे यांना २४० मते पडली. ते १५ मतांनी निवडून आले.

वार्ड क्रमांक दोनमध्ये भाजपचे दगडू शिवराम केदार व राष्ट्रावादीचे रावसाहेब नाना बर्डे यांच्यात लढत झाली. या ठिकाणी एकूण ७४० पैकी ४५४ मतदान झाले. तर नोटाला २ झाले. त्यापैकी रावसाहेब बर्डे यांना १७२ मते पडली. तर दगडू केदार यांना २८० मते पडली. ते १०८ मतांनी निवडून आले.

राहुरी खुर्द ग्रामपंचायत येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी प्रणित जनसेवा मंडळाच्या सौ. अश्विनी सुनिल कुमावत व भाजप प्रणित बुवासाहेब ग्रामविकास मंडळाच्या सौ. दिलशाद निसार शेख यांच्यात लढत झाली. या ठिकाणी १ हजार १४८ पैकी ८७२ मतदान झाले. तर नोटाला १० झाले. त्यापैकी सौ. दिलशाद शेख यांना ४०९ तर सौ. अश्विनी कुमावत यांना ४५३ मते पडली. सौ. अश्विनी कुमावत यांचा ४४ मतांनी विजय झाला.

आरडगांव ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी गटाचा धोबीपछाड करत वंचित बहुजन आघाडीने आपला झेंडा फडकावला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे बाळासाहेब मनोहर म्हसे व वंचित बहुजन आघाडीचे सागर वसंत देशमुख यांच्यात लढत झाली. या ठिकाणी ८९६ पैकी ७०४ मतदान झाले. तर नोटाला ८ झाले. त्यापैकी बाळासाहेब म्हसे यांना २५४ मते पडली. तर सागर देशमुख यांना ४४२ मते पडली. यामध्ये सागर देशमुख यांचा १८८ मतांनी दणदणीत विजय झाला. निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांचे आभार मानून गुलालाची उधळण केली आणि आनंदोत्सव साजरा केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com