
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषदेत कर्मचार्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न मोठा आहे. यात प्राथमिक शिक्षण विभागात पद्वीधर शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या मोठी आहे. या पद्वीधर शिक्षकांच्या रिक्त पदामुळे ग्रामीण भागतील सहावी ते आठवीच्या शाळा ओस पडण्याची भिती असतांना राज्य सरकारने या पद्वीधर शिक्षकांच्या जागा पदोन्नती करण्याऐवजी सरळ सेवेतून भरण्याचा निर्णय घेतला आहे. सरळ सेवेची भरती जेव्हा व्हायची तेव्हा होईल, तोपर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी सहावी ते आठवीच्या शाळांवर त्याचा मोठा परिणाम होतांना दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची 347 पदे रिक्त असून या ठिकाणी अध्यापन कोण करणार ? असा प्रश्न आहे.
राज्यात 2010 पासून शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे शालेय तसेच उच्च शिक्षण स्तरावर सुमारे 65 हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. अनेक वाडी-वस्तीवरील शाळांवर एकेकच शिक्षक आहे. नुकत्याच झालेल्या बदल्या, पदोन्नती व गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती यामुळे जिल्ह्यात 809 पदे रिक्त आहेत. यात पदवीधर शिक्षकांची 347, तर उपाध्यापकांची 413 पदे रिक्त आहेत.
पदवीधर शिक्षक सहावी ते आठवीच्या वर्गाला शिकवतात. शाळेत हे पद रिक्त असेल तर थेट त्या वर्गावरच परिणाम होतो. विज्ञान, भाषा, समाज अभ्यास असे विषय शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. अनेक शाळांत सहावी ते आठवीपर्यंतच्या विषयांना शिकवण्यासाठी पदवीधर शिक्षक नसल्याने पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेमधून काढून खासगी शाळेत टाकली आहेत. शासनाने लवकर या रिक्त जागा भरल्या नाहीत, तर अनेेक शाळा ओस पडण्याची भीती आहे.
73 पदवीधरांना आणणार मूळ पदावर
जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची कमतरता असल्याने 2016 च्या शासन निर्णयानुसार बारावी विज्ञान अर्हतेवर काही शिक्षकांना पदवीधर म्हणून पदोन्नती दिली होती. दरम्यानच्या काळात या शिक्षकांना विज्ञानची पदवी धारण करण्यास सांगितले होते. त्यातील 177 जणांनी या कालावधीत पदवी घेतल्याने त्यांची पदोन्नती गृहित धरण्यात आली. परंतु यातील 73 शिक्षकांनी मुदतीत पदवी न घेतल्याने त्यांंना पुन्हा मूळ पदावर पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच (23 जून) काढण्यात आला आहे.
आता पदवीधर भरणार सरळसेवेतून
पूर्वी बारावी अर्हतेच्या शिक्षकांनी पदवी घेतली तर त्यांना पदवीधर म्हणून पदोन्नती दिली जात होती. परंतु शासनाने आता पदवीधरच्या रिक्त जागा पदोन्नतीने न भरता थेट सरळ सेेवेतून भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
जिल्ह्यात मोठ्या संख्येने पद्वीधर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा सध्या कार्यरत असणार्या शिक्षकांमधून भरण्यात याव्यात अनेक शिक्षकांनी पद्वीचे शिक्षण घेतले असून टीईटीची परीक्षा देखील ते उत्तीर्ण आहे. यातून पद्वीधर शिक्षकांना पदोन्नती मिळावी. पद्वीधर शिक्षकांची स्वतंत्र भरती सरळे सेवेतून न करता सेवेत असणार्या शिक्षकांमधून ती करावी. यासाठी राज्य पातळीवर लढा उभारण्यात येणार आहे.
बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते, नगर