पद्वीधरसाठी उमेदवारी दाखल करण्यास अवघे चार दिवस शिल्लक

सत्ताधारी- विरोधकांच्या राजकीय हालचालींबद्दल तर्कवितर्कांना उधाण
पद्वीधरसाठी उमेदवारी दाखल करण्यास अवघे चार दिवस शिल्लक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन तीन दिवस झाले आहेत व या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 12 जानेवारीपर्यंत म्हणजे अजून चारदिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी शिंदेशाही-भाजप सरकार व विरोधक महाविकास आघाडी यांच्याकडून अजूनपर्यंत कोणाच्याही उमेदवारीची अधिकृत घोषित झालेली नाही आणि एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

त्यामुुळे सत्ताधारी व विरोधकांच्या राजकीय हालचालींबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. दरम्यान, काँग्रेसकडून (महाविकास आघाडीकडून) विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे निवडणूक रिंगणात असणार असून विरोधी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या आमदारकीची मुदत 7 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे त्याआधी 30 जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालया अंतर्गत असलेल्या पाच जिल्ह्यांतील मिळून 2 लाख 61 हजार 444 पदवीधर मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. यात सर्वाधिक मतदार नगर जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 319 असून त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात 66 हजार 709, जळगाव जिल्ह्यात 33 हजार 544, धुळे जिल्ह्यात 25हजार 593 व नंदूरबार जिल्ह्यात 19 हजार 279 उमेदवार आहेत.

या मतदार संघाची आमदारकी सध्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. तांबे भूषवत आहेत. येत्या निवडणुकीतही काँग्रेसकडून त्यांच्याच उमेदवारीची अपेक्षा आहे. पण महाविकास आघाडीकडून अजूनही त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नाही. फक्त वंचित बहुजन आघाडीने येवला येथील निवृत्त अधिकारी रतन बनसोडे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे, पण त्यांनीही अजून उमेदवारी दाखल केलेली नाही.

एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघ ओळखला जायचा. परंतु आता या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व झाले आहे. 2009 मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे डॉ. तांबे यांनी या मतदारसंघाची आमदारकी मिळवली व मागील तीन निवडणुकांतूनही विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर त्यांना यंदाच्या लढतीत राजेंद्र विखे यांच्याशी सामना करावा लागेल, अशी चर्चा आहे. पण भाजपच्या गोटातून अद्याप विखे यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टता दिसत नाही. भाजपने या निवडणुकीसाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना प्रभारी नेमले आहे.

त्यामुळे या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीबाबत त्यांचा शब्द अंतिम मानला जाणार आहे. अशा स्थितीत ते नगर जिल्ह्यातील कोणाला उमेदवारी देतात की, त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील उमेदवार रिंगणात उतरवतात, हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे. वर्षभरापूर्वी नगरमधील काही इच्छुकांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे ही निवडणूक लढवण्याची परवानगी दिली तर जोमाने सभासद नोंदणी करण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते व भाजप काहीसे बॅकफूटवर होते. त्यामुळे श्रेष्ठींनी फारशी अनुकूलता त्यावेळी दाखवली नाही. पण आता राज्यात सत्ताबदल होऊन शिंदेशाही-भाजप सरकार आले आहे व नाशिक पदवीधरची निवडणूक जिंकण्याचे आव्हानही समोर ठाकले आहे.

नगर जिल्ह्यावर विजयाची गणित

नाशिक पदवीधर मतदारसंघात नगर जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 16 हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. तर नाशिकमध्ये 66 हजार 709 मतदार आहेत. पाचही जिल्ह्यात मिळून 2 लाख 58 हजार मतदार आहेत. त्यामुळे निवडणुकीत नगर जिल्ह्याला महत्त्व येणार आहे. शिवाय जिल्ह्यात संगमनेरमध्ये सर्वाधिक 29 हजार 624 तर त्या खालोखाल 15 हजार 354 मतदार राहाता तालुक्यात आहेत. नगर शहरात 10 हजार 288 मतदार आहेत. त्यामुळे संगमनेर आणि राहाता तालुके निकालात निर्णायक ठरणार आहेत. तर जिल्ह्यांमध्ये नगर आणि नाशिक यांच्यात स्पर्धा होईल, असे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com