अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे आणि त्यांच्या परिवाराला जीवनातून, राजकारणातून उठविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मोकाटे प्रकरणात शिवाजी कर्डिलेच मास्टरमाईंड आहेत, असा आरोप नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.
मोकाटे यांच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नुकतेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी मोकाटे यांची जेऊर गटातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आरपीआयच्यावतीने जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांच्या पुतळ्यास जोडे मोरो आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, संदीप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, बाबासाहेब गुंजाळ, माजी सभापती रामदास भोर, रवींद्र भापकर, व्ही. डि. काळे, गुलाब शिंदे, केशव बेरड, प्रकाश कुलट, प्रविण गोरे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शेळके म्हणाले, माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांच्या काळात सुसंस्कृत आणि विकासाचे राजकारण व्हायचे, परंतु आता वैयक्तिक आणि दुसर्या आयुष्यातून उठविण्याचे राजकारण सुरू आहे. विरोधकांकडे काहीच मुद्दा नसल्याने दुसर्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम विरोधक करत आहेत. यावेळी बाळासाहेब हराळ, राजेंद्र भगत, शरद झोडगे, केशव बेरड, बाबासाहेब गुंजाळ यांनीही विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.