
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. सहारे यांनी आरोपी रफीक ईस्माईल शेख (वय 59 रा. दरबार कॉलनी, मुकूंदनगर) याला भादंवि कलम 353 नुसार पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाचे वतीने अति. सरकारी वकील मोहन पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
30 मार्च 2020 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास परीचारीका सुनीता नारायण चौधरी व सिस्टर रेखा चांदणे या मुकूंदनगरमधील दरबार कॉलनीत करोना संसर्गच्या अनुषंगाने सर्वेक्षण करत असताना रेहान रफीक शेख व त्याचे वडील आरोपी रफीक ईस्माईल शेख हे दोघे आले व त्यांची नावे घेत असताना त्या दोघांनी परीचारीका चौधरी व सिस्टर चांदणे यांच्या हातातील रजिस्टर ओढुन रजिस्टरमधील पाने फाडून दम दिला, करोना संसर्गच्या सर्वेक्षणाच्या शासकीय कामात अडथळा केला होता, म्हणून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज एन. शिंदे यांनी करून न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे आलेला पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालायाने रफीक ईस्माईल शेख याला शिक्षा ठोठावली, तर रेहान रफीक शेख यास सदर गुन्ह्यातून निर्दोष सोडण्यात आले. पैरवी अधिकारी सहा फौजदार विलास साठे यांनी सहकार्य केले.