शासकीय वाळूचे वितरण रखडल्याने वाळूतस्करी फोफावली

वाळूतस्करांच्या मनमानीमुळे वाळूसाठी मोजावे लागतात अव्वाच्यासव्वा पैसे
शासकीय वाळूचे वितरण रखडल्याने वाळूतस्करी फोफावली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी पट्ट्यात नायगाव, गोवर्धनपूर या ठिकाणी तर प्रवरा पट्ट्यात वांगी, एकलहरे अशा चार ठिकाणी शासकीय वाळूचे डेपो आहे. परंतू या चारही डोपोवरील वाळू वितरण रखडल्याने तालुक्यात दोन्हीही नदी पट्ट्यामध्ये वाळूतस्करी चांगलीच फोफावली आहे. वाळूतस्करांच्या मनमानीमुळे सर्वसामान्यांना वाळू घेण्यासाठी अव्वाच्यासव्वा पैसे मोजावे लागत आहे.

तालुक्यातील नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळावी तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा बसावा यासाठी शासकीय वाळूचे डेपो तयार करुन त्याठिकाणाहून एका क्लिकवर नागरिकांना स्वस्त दरामध्ये वाळू उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनामार्फत वाळू धोरण जाहीर करण्यात आले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली.

सुरुवातीच्या काळामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पट्ट्यामध्ये नायगाव व गोवर्धनपूर याठिकाणी शासकीय वाळूचे डेपो सुरु करण्यात आले. काही दिवस चालल्यानंतर ते वाळूचे डेपो आता बंद असून सदर डेपो दिवाळीनंतर सुरु होणार आहे. त्यानंतर पुन्हा प्रवरा नदी पट्ट्यामध्ये वांगी व एकलहरे याठिकाणी शासकीय वाळूचे डेपो सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी फक्त वाळूचे डेपो तयार केले जात असून त्याचे वितरणही अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना वाळू मिळणे अवघड झाले आहे. नागरिकांच्या यामजबुरीचा फायदा वाळूतस्कर उठवी लागले आहेत. वाळूसाठी मागेल ती रक्कम मोजावी लागत असल्याने सर्वसामान्यांना मोठी आर्थिक झळ बसत आहे.

अवैध वाळू व्यावसायामुळे तालुक्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. हे वाळूतस्कर कुणालाही जुमानत नाही. वाळू उत्खनन व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्तींना नष्ट करणे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून राज्यशासनाने वाळू धोरणानुसार वाळूचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी वाळूचे डेपो तयार केले.

या नवीन धोरणामुळे सर्वसामान्यांना वाळू अतिशय कमी दरात उपलब्ध झाली. शिवाय अनधिकृत पध्दतीने होणारे वाळूचे उत्खनन यावर आळा बसणार होता. मात्र, श्रीरामपूर तालुक्यामध्ये याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या वाळू तस्करांवर व अनधिकृत वाळू उपशावर आला बसवा हा शासनाचा हेतू होता. तेच वाळूतस्कर चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमणावर वाळू उपसा करीत आहेत.

तालुक्यातील नायगाव, गोवर्धनपूर येथील शासकीय वाळूचे डेपो दीपावलीनंतर सुरू होणार आहेत. तसेच खिर्डी व एकलहरे येथील वाळूच्या डेपोची साठवणूक चालू असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे तोपर्यंत तरी सर्वसामान्यांना वाळूतस्कारांची मनमानी सहन करावी लागणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com