सरकारी- खासगी करोना रुग्णालयात जबाबदारी टाळणार्‍यांवर कारवाई

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढेल आदेश
सरकारी- खासगी करोना रुग्णालयात जबाबदारी टाळणार्‍यांवर कारवाई

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात सुरू असणार्‍या खासगी आणि सरकारी करोना (कोव्हिड) रुग्णालयात जबाबदारी निश्चित केलेले डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य कर्मचारी हे काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. या सर्वांविरोधात साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी शनिवारी रात्री उशीरा काढलेल्या आदेशात स्पष्ट केले की, जिल्ह्यात करोनावर उपचार करण्यासाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालयांत कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी स्वतंत्रपणे डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी हे कर्मचारी ठरवून दिलेली जबाबदारी आणि कामे पार पडत नाहीत.

यामुळे अशा सर्व डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य कर्मचारी यांच्यावर साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनूसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला आहे. जिल्हा भरातून वाढलेल्या तक्रारीनंतर ही बाब समोर असल्याचे द्विवेदी यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केलेले आहे.

कैद्यांची करोना चाचणी बंधनकारक

जिल्हा मध्यवर्ती आणि दुय्यम कारागृहात नव्याने दाखल होणार्‍या कैद्यांची कोविड-19 चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश काढले असून, जिल्ह्यातील कारागृह प्रशासनाला सूचना दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

कारागृहात कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नव्याने दाखल होणार्‍या कैद्यांची कोविड चाचणी अनिवार्य केली आहे. चाचणीद्वारे निगेटिव्ह आलेल्या आणि इतर बंदी कैद्यांची रॅपिड चाचणी करण्याच्याही सूचना जिल्हा प्रशासनाने कारागृह प्रशासनाला केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com