शासकीय कार्यालयात अभ्यंगतांना प्रवेशासाठी लेखी परवानगी सक्तीची

निर्बधाबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून सुस्पष्ट आदेश जारी: खासगी कार्यालयात 50 टक्केच उपस्थिती
शासकीय कार्यालयात अभ्यंगतांना प्रवेशासाठी लेखी परवानगी सक्तीची

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाढत्या कोविड संसर्ग आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुस्पष्ट आदेश काढले आहेत. या आदेशात अभ्यंगातांना शासकीय कार्यालयात प्रवेशासाठी कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी सक्तीची करण्यात आली आहे. तर खासगी आस्थापानामध्ये वर्क फ्रॉमला प्रोत्सहान देत कायालयीन उपस्थिती 50 टक्के ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या आदेशात शासकीय कार्यालयातील प्रमुखांनी नागरिकांना संवादासाठी ऑनलाईन व्हीसीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, कार्यालय परिसिारात किंवा मुख्यालयात बाहेरून येणार्‍यांसाठी व्हीसीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच आवश्यकतेनूसार कर्मचार्‍यांची उपस्थिती व वेळेमध्ये आवश्यक ते बदल करून शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन द्यावेत. खासगी कार्यालयात मात्र कर्मचारी उपस्थिती 50 टक्के ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

दहावी आणि बारावी वगळता अन्य शाळा 15 फेबु्रवारीपर्यंत बंद राहणार असून अपवादात्मक परिस्थितीमध्ये शाळा सुरू करण्यास मान्यता हवी असल्यास सदर विभाग आणि आस्थापना यांना राज्य आपत्ती विभागाकडून रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना अटी आणि शर्ती नूसार परवानगी राहिल. मात्र, प्रेक्षकांना बंदी राहणार असून शॉपिंग मॉल्स, बाजार संकूले, हॉटेल, रेस्टॉरन्टस्, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, हेअर सलून यांना क्षमतेच्या 50 टक्क्यांची अट कायम आहे. लसीकरण पूर्ण झालेल्यांना सार्वजनिक वाहतूक करता येणार आहे. यासह अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असणार्‍या सेवांची माहिती जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात दिलेली आहे.

तसेच कोविड अनुरूप वर्तन, कामाच्या ठिकाणी कोविड नियमाचे पालन, सभा, सभारंभ, विवाह सोहळे, अत्यंविधी याबाबत राज्य सरकारने काढलेले आदेश आणि त्यांचे पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.

दहावी-बारावी वगळून अन्य वर्ग ऑनलाईन

जिल्ह्यातील पहिले ते नववी आणि अकारावीचे वर्ग ऑफलाईनासाठी बंदच राहणार आहे. दहावी आणि बारावीचे वर्ग काही महत्वाच्या कृतीसाठी भरविण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी काढले आहेत. 15 फेबु्रवारीपर्यंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विना अडथा ऑनलाईन अध्यापन करावे, शिक्षकांनी मात्र शंभर टक्के शाळेत उपस्थित राहावे, आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com