शासनाच्या ‘महालॅब’ कडून रक्ततपासणीचा चुकीचा अहवाल

दोषींवर कारवाई करा || तालुका आरोग्य अधिकार्‍यांना निवेदन
शासनाच्या ‘महालॅब’ कडून रक्ततपासणीचा चुकीचा अहवाल

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त तपासणीसाठी दिले असता शासनाच्या महालॅबकडून चुकीचा अहवाल आल्याचा आरोप करून या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन तालुका अधिकार्‍यांना अनिकेत दरंदले यांनी दिले आहे.

सोनई येथील रहिवासी अनिकेत कैलास दरंदले यांनी 16 नोव्हेंबरला प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त तपासणीसाठी दिले. त्याचा अहवाल दोन दिवसांनी मिळाल्यानंतर या अहवालात कोलेस्टेरॉल प्रमाणापेक्षा जास्त वाढले असल्याचे दिसले. दरंदले यांनी खाजगी डॉक्टरला हा अहवाल दाखवल्यावर त्यांनी पुढील धोक्याची कल्पना दिली व लगेच अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला दिला. पण दरंदले यांना थोडीशी शंका आल्याने त्यांनी खाजगी लॅबमध्ये पुन्हा रक्त तपासणी केली असता सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. शासनाच्या महालॅबकडून आलेल्या अहवालाबाबत तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांना निवेदन दिले. दोषींवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

याविषयी सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेंद्र कसबे यांना विचारले असता त्यांनी शासनाने मान्यता दिलेल्या महालॅबकडे आम्ही रक्त तपासणीसाठी पाठवले होते. तेथील रिपोर्ट चुकीचा आल्याचे तक्रारीनंतर उघड झाल्याने याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून दोषीवर कडक कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अगोदरच सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत तक्रारीचा मोठा आगडोंब असताना येथील लॅबचा भोंगळ कारभार समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. येथील लॅब असिस्टंटचे पद अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याची माहिती समजत आहे. आता वरिष्ठ या गंभीर घटनेनंतर काय निर्णय घेतात याकडे परीसराचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com