सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंच गायत्री पेरणेंचे सदस्यत्व रद्द

सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंच गायत्री पेरणेंचे सदस्यत्व रद्द

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायत सरपंच गायत्री अमोल पेरणे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी रद्द केले आहे. सरकारी जागेवर असलेले अतिक्रमण सिद्ध झाल्याने सदर निर्णय देण्यात आला असून सरकारी जागेवर अतिक्रमण भोवले असून या निकालामुळे परिसरातील गावांत राजकीय खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक ऑगस्ट 2022 मध्ये झाली होती. यामध्ये गायत्री पेरणे विजयी होऊन सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. परंतु राहुरी नवीन गावठाण येथील किसन सकृबा पारधे यांनी जानेवारी 2023 मध्ये याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्याकडे सरपंच गायत्री पेरणे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी गटविकास अधिकारी, राहुरी यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी पाहणी करून अहवाल सादर केला.

यामध्ये सरपंच गायत्री अमोल पेरणे व पती अमोल चंद्रभान पेरणे यांनी गट नंबर 682 मध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे दिसून आले. तसेच ग्रामपंचायत रेकॉर्डला देखील अतिक्रमण असल्याचे दिसून आले. त्यानुसार शासकीय जागेवर अतिक्रमण सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी सरपंच गायत्री अमोल पेरणे यांचे सरपंच पदासह सदस्यत्व रद्द करत असल्याचे आदेश दिले आहेत. अर्जदाराच्या वतीने अ‍ॅड. विनय गरुड यांनी कामकाज पाहिले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com