जलसंपदा विभागाच्या खाजगीकरणास विरोध

सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून आंदोलनाचा इशारा
जलसंपदा विभागाच्या खाजगीकरणास विरोध

अहमदनगर (प्रतिनिधी)

जलसंपदा विभागात आकृतिबंधाच्या नावाखाली पद संख्या कमी करून उपलब्ध शासकीय कामे ठेकेदारांना देण्याचे काही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याने या खाजगीकरणास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला आहे. तसेच वेळप्रसंगी संघटनेच्या माध्यमातून राज्यात प्रखर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शासनाने उपलब्ध रिक्त पदे अनुकंपा वरील प्रतीक्षा यादीतून तसेच सरळ सेवा भरतीतून सुशिक्षित बेकार पात्र उमेदवार भरण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे यांनी दिली आहे. राज्य शासनाचे सर्वच विभागात आस्थापनेचा आकृतिबंध यापूर्वीच लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रशासकीय कामासाठी आवश्यक ती पदे सर्वच खात्यांतर्गत विहित करण्यात आली आहेत.

सध्या मंजूर असलेल्या पदांपैकी मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने ती तातडीने भरणे आवश्यक आहे. कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांकडे एकाहून अधिक पदांचा कार्यभार अतिरिक्त रित्या सोपविण्यात आलेला आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असून, पर्यायाने जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी उपलब्ध कर्मचारी, अधिकारी यांना कार्यालयीन वेळानंतर तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून प्रलंबित कामाचा निपटारा करावा करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये पुनश्च सुधारित आकृतिबंधाच्या नावाखाली काही विभागाचे खाजगीकरण करण्याचे धोरण राज्य शासनाकडून राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.