करोनाच्या अटकावासाठी शासकीय विभागांनी समन्वय ठेवावा - बानायत

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उपविभागीय बैठकीत सूचना; मंदिर व प्रशासनाने भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज राहावे
करोनाच्या अटकावासाठी शासकीय विभागांनी समन्वय ठेवावा - बानायत
सीईओ भाग्यश्री बानायत

शिर्डी (शहर प्रतिनिधी)

येत्या ७ ऑक्टोबरपासून श्री साईबाबा मंदिर खुले होणार आहे. करोना संसर्गाचा अटकाव करण्यासाठी राहाता व शिर्डीमधील महसूल, पोलीस, आरोग्य, बांधकाम, नगरपालिका, रेल्वे, एसटी, विमानतळ व इतर सर्व शासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामकाज करावे आणि करोना नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. अशा सूचना साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी केल्या.

धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची उपविभागीय बैठक साईबाबा संस्थानच्या सभागृहात काल गुरुवारी संपन्न झाली. भाग्यश्री बानायत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब शिंदे. शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, राहाता पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, शिर्डी विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक सुनील श्रीवास्तव, औद्योगिक सुरक्षा बलाचे उपसमादेशक दिनेश दहिवदकर, विमानतळाचे सर्व ऑपरेटर्स, शिर्डी रेल्वे स्थानकाचे प्रबंधक एल. पी. सिंह, रेल्वे पोलीस बलाचे पोलीस निरीक्षक सी. पी. सिंह, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक, हॉटेल असोशिएशन व हॉकर्स असोशिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती बानायत म्हणाल्या, प्रशासनाने भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाले पाहिजे. प्रत्येकाने ६ फुटांचे अंतर पाळणे, मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक वसॅनिटायझरने वारंवार हात धुणे या करोना नियमावलीतील मुख्य तीन नियमांचे पालन भाविक व नागरिकांकडून झाले पाहिजे. यासाठी प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे. अशावेळी जे नियमावलीचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कार्यवाही करावी. नगरपालिका व बांधकाम विभागाने शहर व परिसरात जेथे रस्ते खराब असतील तेथे रस्ते दुरूस्ती व डागडुजीचे काम हाती घ्यावे. भक्तांसाठी पुरेशी वाहनतळाची व्यवस्था आहे का याचा आढावा पोलीस विभागाने घ्यावा. शहर व परिसरात ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून कोविड नियमांचे पालन करण्याबाबत जाणीव-जागृती करावी. अशा सूचनाही बानायत यांनी यावेळी केल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे म्हणाले, राहाता तालुक्यात आतापर्यंत २४ हजार रूग्ण आढळून १६९ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १८ हजार ७०० रूग्ण केवळ दुसऱ्या लाटेतील आहेत. ३५९ सक्रीय रूग्ण आहेत. आतापर्यंत ४६२ करोनामुळे मृत्यु झाले आहेत. यात ४०० मृत्यु हे दुसऱ्या लाटेत झाले आहेत.

राहाता तालुक्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५.०३ इतका आहे. तेव्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली पाहिजे. कोठेही कोविड नियमात हलगर्जीपणा होणार नाही याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. शिर्डीमध्ये दक्षिण भारतातून जास्त भाविक येत असतात. अशा भाविकांची रेल्वे, विमानतळ व एस.टी बसस्थानकाच्या ठिकाणीच कोविड तपासणी करावी. अहवाल निगेटिव्ह आल्यावर भाविकाला पुढे प्रवास करू द्यावा, अशा सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.

शासनाने दि. २४ सप्टेंबर २०२१ जारी केलेल्या शासन निर्णयातील निर्देशाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यावेळी वाचन केले. तसेच प्रत्येक विभागाने त्याप्रमाणे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही यावेळी ठाकरे यांनी सांगितले. यावेळी पोलीस, नगरपालिका, रेल्वे, विमानतळ, एसटी महामंडळ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही त्यांच्या सूचना बैठकीत मांडल्या.

Related Stories

No stories found.