
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
नगर जिल्ह्यासह राहाता तालुक्यातील 18 गावातील पोलीस पाटलांची पदे रिक्त आहे. आघाडी सरकारने मध्यंतरी भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. आरक्षणासाठी विशेष ग्रामसभा घेवून लोकसंख्येची आकडेवारीही संकलीत झाली होती. मात्र मध्येच सरकार बदलल्याने ही प्रक्रीया बंद झाली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बंद पडलेल्या भरती प्रक्रीयेत लक्ष घालून ही प्रक्रीया सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
तालुक्यातील पिंपरी निर्मळ, गोगलगाव, एकरुखे, दाढ बु., पिंपरी लोकाई, हसनापूर, लोहगाव, तिसगाव, पिंपळवाडी, रुई, नांदुर्खी बुद्रुक, केलवड बु., शिंगवे, रांजणगाव खुर्द, धनगरवाडी, आडगाव बु., रामपूरवाडी, लोणी बु. या 18 गावांचे पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. मध्यंतरी आघाडी सरकारने ही भरती प्रक्रीया सुरू केली होती. नाशिक विभागीय आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे रिक्त जागांची बिंदू नामावली प्रमाणे जिल्हाधिकार्यांनी ही पदे भरण्यासाठी मान्यता दिलेली होती.
त्यामुळे आरक्षित जागांच्या भरतीसाठी उपविभागीय अधिकारी शिर्डी यांनी गावामधील लोकसंख्येची प्रवर्गनिहाय आकडेवारी निश्चित करण्यासाठी ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले होते. या ग्रामसभा होऊन माहितीही संकलीत झाली होती. आरक्षण सोडती होऊन भरती प्रक्रिया होणार असतानाच आघाडी सरकार कोसळले व पोलीस पाटील भरती प्रक्रिया बंद पडली. या गावांना नवीन पोलीस पाटील मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच प्रक्रीया थंड पडल्याने या गावातील नागरिकांचा हीरमोड झाला आहे.
पोलीस पाटील भरती प्रक्रिया महसूल विभागांच्या अंतर्गत येत असल्याने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भरती प्रक्रियेमध्ये लक्ष घालावे व थांबलेली प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.