
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील गोवर्धन येथे सिंघम म्हणून ओळख असलेलेे गौण खनिकर्म अधिकारी वसिम सय्यद यांनी वाळूतस्करी करणार्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईचा वाळूतस्करांनी मोठा धसका घेतला असून कारवाईनंतर गोदापात्रातील अनेक गावांतील वाळू पाँईटवर दोन-तीन दिवसांपासून शुकशुकाट दिसत आहे. आतापर्यंत ही सर्वात मोठी पहिलीच कारवाई झाल्याने वाळूतस्कारांचे धाबे दणाणले आहेत.
गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी केली जाते. पुणतांबा, पुरणगाव, मातुलठाण, बाभुळगाव गंगा, नायगाव, जाफ्राबाद, सरला गोवर्धन आदी ठिकाणांहून वाळूतस्करी केली जाते. अधिकार्यांवर नजर ठेवून ही अवैध वाळुूवाहतूक केली जाते. त्यामुळे अधिकारी कारवाईसाठी गेले तर रिकाम्या हाती त्यांना परत यावे लागते. त्यामुळे तस्कारांची मुजोरी वाढली होती. मात्र गौण खनि कर्म अधिकारी वसिम सय्यद यांनी थेट टेम्पोतून येऊन वाळूतस्करांवर कारवाई केली. त्यामुळे कारवाईच्या भितीने वाळूतस्कर गोदापात्रात फिरकलेच नाही. एकंदरितच वाळूतस्करांनी या कारवाईचा धसका घेतल्याने गोदापात्रात शुकशुकाट झाला.
शासकीय परमिटच्या नावाखाली अगदी गोवर्धनच्या जवळ असलेल्या वैजापूर तालुक्यातील बाभुळगावगंगा येथून मोठ्या प्रमाणात श्रीरामपूर हद्दीतून हजारो ब्रास वाळू रात्री उपसा करून सर्व वाळू बाभुळगावगंगा मध्ये नेऊन नदीपात्राच्या बाहेर टाकली जाते. या भागातही गौण खनिकर्म अधिकारी वसिम सय्यद यांनी अशाच प्रकारची कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.
गोवर्धन येथील वाळू चोरी प्रकरणात अटक केलेले आरोपी विशाल बाळासाहेब खैरे (रा.रामपूर), फारूक कमू पठाण (रा.जाफराबाद), सागर रावसाहेब जाधव (रामपूर), भारत नानासाहेब पांढरे (रा.रामपूर), साकीब सईद शेख (रा.श्रीरामपूर), प्रमोद जालिंदर चांदणे (रा. वडाळा महादेव) व दिनेश अशोक आमले (रा. शिरसगाव) यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. खराडे यांनी दिले आहेत. पोलीस उपसिरीक्षक निकम हे तपास करीत आहेत. तर आरोपीतर्फे अॅड.आरिफ शेख, अॅड. तुषार चौदंते काम पाहत आहेत.